Breaking News

शेतकरी- पोलिसांमधील धुमचक्रीमुळे टिकरी बॉर्डर बंद, अडेलतट्टू भूमिका घेतल्यास..

देशातील शेतकऱ्यांच्या संघटनेने शेतमालाला हमी भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी केंद्र सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा चल्लो दिल्लीची घोषणा देत १३ फेब्रुवारी २०२४ रोजी दिवसभरात पंजाब, हरियाणातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी सिंघू अर्थात शंभू सीमावर्ती भागात पोहोचले. पण आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झडप उडाल्याने अखेर दिल्लीच्या दिशेने असलेली टीकरी बॉर्डरवरील सुरक्षा आणखी कडक करत हा सीमावर्ती भागही सीलबंद करण्यात आला. त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिल्लीच्या वेशीवरच थांबावे लागणार आहे.

दरम्यान, भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी देशातील शेतकऱ्यांनी शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याची मागणी केली आहे. परंतु केंद्र सरकारकडून सातत्याने त्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर केंद्र सरकारने शेतकऱ्याशी चर्चेला पाचारण करून शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे किमान आधारभूत किंमत द्यावी अशी मागणी करत जर सरकारने अडेलतट्टूपणाची भूमिका घेत चर्चा करण्यास नकार दिल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा सूचक इशाराही भाजपाला दिला.

नरेश टिकैत पुढे बोलताना म्हणाले की, त्याचबरोबर देशभरातील विविध शेतकऱ्यांच्या संघटनांनी १६ फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक दिलेली असून या दिवशी सर्व व्यापार, उद्योग व्यवसाय या सर्व गोष्टी बंद ठेवण्याचे आवाहन सर्वांना केले. मात्र रूग्णवाहिका, शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱे विद्यार्थी वाहनांना आणि लष्करी वाहनांना या संपातून वगळण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.

तर दुसऱ्याबाजूला केंद्रीय मंत्री अर्जून मुंडा म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतला जाणार नाही. तसेच शेतकऱ्यांनी चर्चेसाठी पुढे यावे सरकार चर्चेसाठी तयार असून शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनी त्यांचे शिष्टमंडळ घेऊन चर्चेसाठी यावे अशी विनंती केली.

पुढे बोलताना अर्जून मुंडा म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत आणि त्यांच्या प्रश्नांबाबतची माहिती आपणास आहे. मात्र काही राजकिय लोक शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे अशी टीकाही केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *