Breaking News

अशोक टेकवडे यांच्या पक्षांतरावर अजित पवार म्हणाले, ती कारणं त्यांनाच विचारा… मला मिळालेली माहिती वेगळीच आहे

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यापाठोपाठ महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची चर्चा पहायला मिळत आहे. यासंदर्भात महाविका आघाडीतील तिन्ही पक्षांकडून चर्चा सुरू करण्यात आली असली, तरी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला बारामती लोकसभा मतदारसंघातल्या पुरंदर भागामध्ये मोठा धक्का बसला आहे. पुरंदरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी भाजपामध्ये करण्याचा निर्णय घेतला असून मंगळवारी त्यांचा भाजपात प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी अशोक टेकवडेंच्या भाजपा प्रवेशावर सूचक प्रतिक्रिया दिली. अशोक टेकवडे अजित पवारांच्या जवळचे नेते मानले जातात. मात्र, त्यांच्याच भाजपा प्रवेशामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

अजित पवार म्हणाले, त्या कार्यकर्त्याला मीच तयार केला होता. त्याला मी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक केलं होतं. त्यानंतर आमदारकीचं तिकीट दिलं. निवडून आणलं. त्यांनी कामही केलं. नंतरच्या काळात तिथे आमच्या स्थानिक पक्षांतर्गत काही लोकांशी त्यांचं जमत नव्हतं. मी चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मनाचा पक्का निश्चय केला असेल. आम्ही प्रयत्न केला. पण ते म्हणाले की मी आणि माझ्या मुलाने निर्णय घेतला आहे. त्यांचे वडीलही शरद पवारांचे कट्टर कार्यकर्ते होते, असं सांगितले.

अजित पवार म्हणाले, मी अशोक टेकवडेंना नेहमीच जवळ केलं. माझ्या परीनं पक्षाच्या माध्यमातून ताकद देण्याचा प्रयत्न केला. स्थानिक वादातून दुर्दैवानं आम्हाला मार्ग काढता आला नाही. म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली. त्याला इतरही काही कारणं आहेत. ती कारणं तु्म्ही त्यांनाच विचारली तर बरं होईल. कारण मध्ये त्यांच्याकडे आयटी विभागाची धाड पडली. तेव्हा काही कागदपत्रं तिथे मिळाली असं माझ्या कानावर आलं. त्यामुळे हे असं घडलंय असं ऐकायला मिळतंय, असा संशय यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, अशोक टेकवडेंनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांच्या भाजपा प्रवेशाचं कारण सांगितलं आहे. मी निर्णय घेतलाय की भाजपामध्ये प्रवेश करायचा. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला फोन केला. शिवाय माझी त्यांच्याबरोबर समोरासमोर बैठकही झाली. माझ्या लक्षात आलं की पुरंदरच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला काम करण्याची संधी आहे. देवेंद्र फडणवीसांनी ३०-३५ मिनिटांच्या आमच्या चर्चेत मला ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या मला योग्य वाटल्या. म्हणून मी हा निर्णय घेतला, असं म्हणाले.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *