Breaking News

आता चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही बावनकुळेंच्या वक्तव्याची री…आमची तयारी विधानसभेसाठी २८८ तर लोकसभेच्या ४८ जागांची भाजपाकडून तयारी

राज्यातील सत्तासंघर्षावरील याचिकांवरील अंतिम सुनावणी कधी लागेल याबाबतचा कोणताही अंदाज स्पष्टपणे दिसून येत नाही. तसेच राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांही अद्याप लांब असतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला फक्त ४७ जागा विधानसभेच्या निवडणूकीत देणार असल्याचे सांगत २४० जागांवर भाजपाची तयारी असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले. त्यावरून टीका टीपण्णी सुरु झाल्यानंतर बावनकुळे यांनी लगेच यु टर्न घेतल्यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याची री माजी प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ओढली आहे. यामुळे पुन्हा भाजपा आणि शिंदे गटात धुसफूस सुरु झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

पिपंरी- चिंचवड येथील विकास कामांचा शुमारंभ केल्यानंतर मंत्री चंद्रकात पाटील प्रसार माध्यमाशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याची री ओढली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय जनता पार्टी एक निवडणूक झाली की पुढच्या निवडणुकीची तयारी करत असते. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील विधानसभेच्या २८८ आणि लोकसभेच्या ४८ जागांची आम्ही तयारी करत आहोत. शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येतील, हे आता ठरवण्याचे काही कारणच नाही. त्यांना आमची तयारी उपयोगी पडेल.

यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शंकरराव मासुळकर अर्बन हेल्थ सेंटर व आय रुग्णालय, भोसरी गवळीमाथा आणि कासारवाडीतील कचरा हस्तांतरण केंद्राचे पाटील यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार आदी उपस्थित होते.

श्रेयवादाच्या फलकबाजीवर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रत्येकाला आपली भूमिका असते. तशी विरोधकांना विरोधकांची भूमिका असते. त्यांनी कुठल्याही चांगल्या गोष्टीमधून सुद्धा दुर्बीण लावून एखादा छोटा मोठा दोष शोधायचा असतो. वायसीएमधील नेत्र विभाग येथे स्थलांतरित केला जाणार आहे. या नवीन इमारतीत डोळ्यांशी संबंधित सर्व आजारांची तपासणी, शस्त्रक्रिया होतील. उद्यापासून कामकाज सुरू होईल.

जुनी पेन्शनबाबत सकारात्मक जुनी पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सहावा दिवस असून त्याबाबत अद्याप तोडगा निघाला नसल्याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शनबाबत सकारात्मक असल्याचे वारंवार सांगितले आहे. त्यासाठी वरिष्ठ निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. माझे सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की परीक्षेचा कालावधी आहे. रुग्णांचे भयंकर हाल होत आहेत. त्यामुळे निदान अत्यावश्यक सेवा सुरू ठेवाव्यात. कोणत्याही संपाचे दोन भाग असतात. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करायचे असते. बाकीच्यांनी संप करायचा असतो.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *