Breaking News

राहुल गांधीच्या माफीप्रकरणी संजय राऊत म्हणाले, माफी मागायची असेल तर आधी… गांधींच्या विधानावर संसदेत सध्या सुरु भाजपाकडून करण्यात येत असलेल्या आक्रमक भूमिकेवर राऊत यांचे वक्तव्य

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी हे लंडनच्या तीन दिवसीय दौऱ्यावर होते. त्यावेळी तेथील भारतीय पत्रकारांच्या संघटनेच्यावतीने घेण्यात आलेल्या मुलाखती दरम्यान आणि तेथील थिंक टँक या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी देशातील एकूण राजकिय घडामोडींवर भाष्य केले. त्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली असून, संसदेतही भाजपाकडून राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे. परंतु आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या वादात उडी घेत, माफी मागायची असेल तर भाजाप आणि कॅबिनेटमध्ये अनेक जण आहेत. त्यांनी सर्वात आधी माफी मागितली पाहिजे असे सांगत भाजपावरच पलटवार केला.

आज रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या भूमिकेला पाठिबा देताना बोलत होते.

या वेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, राहुल गांधी माफी मागणार नाही, मी काँग्रेसचा प्रवक्ता नाही. मी शिवसेनेचा मुख्य प्रवक्ता आणि नेता आहे. माफी मागायचीच असेल तर भाजपा आणि कॅबिनेटमध्ये असे अनेक जण आहेत, त्यांनी सर्वात आधी माफी मागितली पाहिजे अशी मागणीही केली.

परदेशात जाऊन देश आणि देशातील नेत्यांबद्दल तुम्ही जी जी वक्तव्यं केलीत, त्यासाठी कोण माफी मागणार?, असा सवालही संजय राऊतांनी भाजपा नेत्यांना विचारला. राहुल गांधींनी लोकशाहीवर काही प्रश्न उपस्थित केले. ज्या पद्धतीनं आपल्या संसदेत काम सुरू आहे. आमच्यासारख्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकलं जात आहे. आमचा आवाज हे लोक बंद करतात. फक्त माइक नव्हे तर आमचा आवाज बंद करण्यासाठी आमच्यावर खोटे खटले दाखल करून आम्हाला तुरुंगात टाकलं जातं. लोकशाही वाचवण्यासाठी राहुल गांधी आपली भूमिका मांडत असतील तर माफी का मागतील, ब्रिटिशांच्या विरोधातही बरेच क्रांतिकारक देशाबाहेर जाऊन बोलत होते. कारण त्यांना देशात बोलू दिलं जात नव्हतं, असं म्हणत संजय राऊतांनी राहुल गांधींच्या विधानाचं समर्थन केले.

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारताची लोकशाही धोक्यात असल्याचं विधान करत त्यानंतर त्यावर स्पष्टीकरण दिले होते. यादरम्यान त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवरही निशाणा साधला होता. ‘भारतीय लोकशाहीवर हल्ला होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ईडी, सीबीआय यासारख्या संस्थांचा सरकारकडून विरोधकांविरुद्ध शस्त्र म्हणून वापर केला जात आहे. हिंडेनबर्ग आणि अदानी यांच्या मुद्द्यावरही त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला होता. हिंडेनबर्ग अहवाल हा भारतावरील हल्ला नसून तो एक उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराविरुद्ध होता, असे सांगितले होते. अदानी म्हणजे भारत नसल्याचं म्हटल्यानंतर राहुल गांधींना थांबवत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही त्यांना बैठकीतील विषयावर केवळ चर्चा करा, असा सल्ला दिला.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *