Breaking News

नाना पटोलेंचा सवाल, विरोधकांना संपवण्याचा सत्ताधारी पक्षांचा डाव आहे का? माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व खा. संजय राऊत प्रकरणी चौकशी करून दोषींना अद्दल घडवा

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जात असून त्यांचा घातपात करण्याचा डाव समोर आला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मारण्याची सुपारी देण्यात आल्याचे समजते. असे प्रकार राज्यात वाढत असून विरोधकांना संपवण्याचा सत्ताधारी पक्षांचा डाव आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी त्यांच्यावर खाजगी व्यक्ती पाळत ठेवत असून त्यांचा घातपात करण्याचा प्रयत्न असल्याची तक्रार पोलिसांकडे दिली आहे. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांवर पाळत का व कशासाठी ठेवली जात आहे? पोलीस व राज्य सरकारने याची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी व दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना मारण्याची सुपारी दिल्याची तक्रारही संजय राऊत यांनी दिली आहे.सत्तेत बसलेल्या लोकांकडून विरोधकांना संपवण्याचे काम केले जात असेल तर लोकशाही व्यवस्थेला हे काळीमा फासणारे आहे. शाहू, फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात विरोधकांना संपवण्याचे काम होत असेल तर ते कदापी सहन केले जाणार नाही. महाराष्ट्रात अशा प्रकारचे राजकारण याआधी कधीच नव्हते. सत्तेत वाईट मानसिकतेचे लोक बसले आहेत त्यांच्या इशाऱ्यावर जर असे प्रकार होत असतील तर राज्यासाठी ते अत्यंत भयानक आहे. राज्य सरकारने अशोक चव्हाण व खा. संजय राऊत यांच्या प्रकरणात गांभिर्याने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी.

मागील सहा-सात महिन्यात राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. विशेषतः सत्ताधारी पक्षाचे लोकच दादागिरी करत आहेत. विरोधकांना शत्रु मानून त्यांना संपवण्याचे प्रकार होत आहेत. मागील महिन्यात काँग्रेसच्या महिला आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करण्यात आला. औरंगाबादमध्ये माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. सत्ताधारी आमदाराने विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार केला. आमदारच हातपाय तोडण्याची भाषा करत आहेत. हे सर्व प्रकार महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात वाढले आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्य सरकारने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून दोषींना अद्दल घडवावी, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *