Breaking News

संजय राऊत म्हणाले, पिंपरीची जागा शिवसेना तर कसबा पेठेचा निर्णय दोन्ही काँग्रेस घेतील पुण्यातील पोट निवडणूकीबाबत संजय राऊत यांची माहिती

कसबा पेठच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. या दोन्ही जागा महाविकास आघाडीकडून अर्थात राष्ट्रवादीकडून लढविण्याची तयारी सुरु असताना पिंपरी-चिंचवडची जागा शिवसेना लढविणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

आज सकाळी ते प्रसारमाध्यमाशी बोलत होते. त्यावेळी संजय राऊत यांनी वरील माहिती दिली.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, पिंपरी-चिंचवडच्या रिक्त जागेसाठी शिवसेनेने उमेदवार द्यावा की नाही याबाबत शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत शिवसेनेने उमेदवार देण्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच यापूर्वी जगताप यांच्या विरोधात शिवसेनेचे पिंपरी चिंचवड महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी चांगली लढत दिली होती. तसेच कलाटे यांनी एक लाखाहून अधिक मते मिळविली होती. त्यामुळे या जागेवर ठाकरे उमेदवार असावा यासाठी शिवसेना आग्रही असल्याचे स्पष्ट केले.

तसेच चिंचवडच्या मतदारांचाही तो हट्ट आहे. काल रात्री विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार, जयंत पाटील, सुनिल तटकरे हे मातोश्रीवर आले होते. आमच्यात चर्चा झाली. आम्ही आमची भूमिका मांडली. कसब्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने लढावी आणि चिंचवडची शिवसेनेने लढावी अशी भूमिका आम्ही स्पष्ट केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

यावरून संजय राऊत म्हणाले, अजित दादांचं काही म्हणणं होतं. आम्ही ऐकून घेतलं. पण चिंचवडची जागा आम्ही लढावी, असं मत मांडल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसदेखील चिंचवड येथील जागेसाठी आग्रही असल्याचं दिसून येतंय. पण कसबा पेठच्या जागेबाबर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णय घ्यावा पण पिंपरी-चिंचवडची जागा लढविण्याबाबत शिवसेना आग्रही असल्याचे ठामपणे सांगितले.

कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी भाजपाच्या बैठका सुरु आहेत. आजच्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपाची कोअर कमिटी, पार्लमेंटरी बोर्ड यांच्याकडून उमेदवारीसंदर्भात निर्णय होत असतो. दिल्लीतून ही उमेदवारी जाहीर होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कसब्यातून मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक तर चिंचवडमधून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांनाही उमेदवारी देण्याची चर्चा आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *