Breaking News

दावोसमध्ये मुख्यमंत्री शिंदे नेमके ७६ की २८ तास उपस्थित? केसरकर-सामंताच्या दाव्यात विसंगती आदित्य ठाकरेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यातील उपस्थितीबाबत मंत्र्यांच्या दाव्यात विसंगती

दोन वर्षाच्या कोरोना कालावधीनंतर स्वित्झर्लंडमधील दावोस येथे भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे गेले होते. दावोस येथून परतल्यानतर मुख्यमंत्री शिंदेंनी १ लाख ४० हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केल्याची माहिती दिली. मात्र या गुंतवणूकीबाबत आणि मुख्यमंत्र्यांनी तेथे जावून नेमके किती तास काम केले याबाबतचा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला. त्यामुळे शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेत कामकाजाच्या तासाबाबत विसंगती आढळून आल्याने आदित्य ठाकरेंच्या आरोपामुळे शिंदे गट चांगलाच गडबडल्याचे दिसून येत आहे.

या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत गेले होते. उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस हे काही कारणामुळे दावोसला जाऊ शकले नव्हते. तसेच १९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत मेट्रो आणि इतर कामांच्या उद्घाटनासाठी येत असल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांना दावोसचा दौरा अर्धवट सोडून परतावे लागले.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज बुधवारी २५ जानेवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे ७६ तास दावोसमध्ये होते आणि ते केवळ चार तास झोपत होते, असा दावा केला.

आदित्य ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेत दावोस दौऱ्यात केवळ दोन-तीन दिवसात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर तब्बल ३५ ते ४० कोटींचा खर्च झाल्याचा आरोप केला. या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी शिंदे यांचे कौतुक करत असताना हा दावा केला.

मात्र उद्योग मंत्री उदय सामंत हे डाव्होस दौऱ्यावरुन २० जानेवारी रोजी जेव्हा परतले होते. तेव्हा त्यांनी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डाव्होसमध्ये २८ तास असल्याचे म्हटले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डाव्होसमध्ये नेमके किती तास होते? यावरुन संभ्रम निर्माण झाला आहे.

उदय सामंत यांनी सांगितले की, डाव्होसमध्ये दोन किलोमीटर परिसरात जागतिक आर्थिक परिषदेचे शिबीर भरले होते. महाराष्ट्राच्या पॅव्हेलियनमध्ये अनेक देशांचे प्रमुख, भारतातील इतर मुख्यमंत्री आणि उद्योजक भेट देत होते. मुख्यमंत्र्यांचे दावोसमधील वास्तव्य हे फक्त २८ तासांचे होते. पण या २८ तासांत ते महाराष्ट्रात ज्या गतीने काम करतात, त्याच्या दुप्पट गतीने डाव्होसमध्ये काम करत होते असा दावा केला होतो.

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोसमध्ये नेमके किती तास होते? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान दावोसमधील मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीबाबत वाद परस्पर दावे करण्यात आले असले तरी दावोस दौरा यशस्वी झाल्याचे सांगत १ लाख ४० हजार कोटी रूपयांची पहिल्यांदाच गुंतवणूक राज्यात आणण्यात आल्याचा दावा केला.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *