Breaking News

राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार म्हणाले, आमचा पाठिंबा त्यांना जो… संभाजी राजे यांच्याबाबत स्पष्ट बोलण्याचे टाळले

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून निवडूण जाणाऱ्या ५ जागांसाठी निवडणूक जाहिर झाली. त्यातच काही अतिरिक्त मते भाजपा आणि महाविकास आघाडीची शिल्लक रहात असल्याने सहाव्या जागेसाठी माजी खासदार संभाजी राजे हे ही रिंगणात उतरले आहेत. तर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार जाहिर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले असतानाच पवार यांनी सांगितले की, ६ व्या जागेसाठी शिवसेना जो उमेदवार देईल त्यास राष्ट्रवादीचा पाठिंबा राहणार असल्याचे स्पष्ट केले.

पुण्यात ब्राम्हण समाजाच्या संघटनांबरोबर झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सहाव्या जागेसाठी संभाजी राजे हे ही रिंगणात उतरले आहेत. तर शिवसेनाही आपला ६ वा उमेदवार देणार असल्याचे जाहिर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कोणाला पाठिंबा देणार अशी विचारणा केल्यानंतर ते म्हणाले की, आमचा पाठिंबा शिवसेनेच्या उमेदवाराला राहणार असून मग तो उमेदवार संभाजी राजे असू द्या नाही तर अन्य कोणी आमचा पाठिंबा त्यांनाच राहणार आहे.

यावेळी ज्ञानवापी मस्जिदीबाबत विचारले असता ते म्हणाले की, देशात प्रमुख्याने वाढती महागाई, बेरोजगारी यासह काही विषय मुख्य आहेत. मात्र त्या विषयावरून लक्ष हटविण्यासाठी ज्ञानवापीचा मुद्दा मुद्दाम पुढे आणण्यात आला आहे. मात्र हा विषय लवकरात लवकर संपविला पाहिजे. अन्यथा देशात पुन्हा हिंदू विरूध्द मुस्लिम असे वातावरण निर्माण होऊन संघर्ष होईल अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

नवाब मलिक यांच्यावर विशेष न्यायालयाने केलेल्या निरिक्षणाच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता ते म्हणाले की, माझ्यावरही यापूर्वी अशा पध्दतीचे अनेक आरोप झाले. दाऊदशी संबध असल्याचा आरोप माझ्यावरीही झाला. पण पुढे काय झाले त्याचे असा प्रतिसवाल करत मलिक यांच्यावरील आरोपातूनही काहीही सिध्द होणार नसल्याचे सांगत त्यांनी मलिकांची पाठराखण केली.

याशिवाय ब्राम्हण समाजाची आठवण शरद पवारांना का झाली असा टोला फडणवीस यांनी लगावला होता. त्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, मला अशी कोणतीही आठवण झालेली नाही. कुठल्याही समाजाचे काहीही प्रश्न असतील तर ते ऐकून घेतले पाहिजेत. फडणवीस म्हणतात ब्राम्हण समाजाची आठवण आम्हाला झाली, पण त्यांचा आम्हाला राजकिय फायदा होईल की नाही हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नसल्याचा पलटवार केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *