Breaking News

आरोग्य विभाग परीक्षेतील गोंधळाबद्दल टोपे यांनी राजीनामा द्यावा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी

आरोग्य विभागाच्या रविवारी झालेल्या परीक्षेत तिसऱ्यांदा गोंधळ उडाल्याने अनेक विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप भोगावा लागला. या गोंधळाला आरोग्यमंत्री राजेश टोपे हेच जबाबदार असून या गोंधळाची जबाबदारी स्वीकारत टोपे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

भांडारी यांनी पत्रकात म्हटले आहे की, आरोग्य विभागातर्फे मागील परीक्षा घेण्याचे कंत्राट न्यासा कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने केलेल्या गोंधळामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली होती. उत्तर प्रदेश सरकारने आणि राज्यातील महविकास आघाडी सरकारनेही या कंपनीला काळया यादीत टाकले होते. मात्र आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आग्रहामुळे याच कंपनीला आज झालेल्या परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यामुळे आज झालेल्या गोंधळाला आरोग्यमंत्री टोपे हेच जबाबदार असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

२४ ऑक्टोबर रोजी झालेल्या परीक्षेवेळी अनेक ठिकाणी गोंधळ उडाला. अनेक विद्यार्थ्यांना वेळेत प्रश्नपत्रिकाच मिळाल्या नसल्याचे उघड झाले. उमेदवारांच्या आसन व्यवस्थेमध्येही गोंधळ उडाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मुंबई, पुणे, नाशिक या केंद्रांवर परीक्षेवेळी गोंधळ झाल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. काही विद्यार्थ्यांना सकाळच्या परीक्षेसाठी एक केंद्र तर दुपारच्या परीक्षेसाठी दुसऱ्या जिल्ह्यातील केंद्र दिले गेले. नाशिक येथे खासगी वाहनांतून प्रश्नपत्रिका आणल्या गेल्याचीही तक्रार आहे. या परीक्षा प्रक्रियेबाबत संशय व्यक्त होत असल्याने या परीक्षा नव्याने घेण्यात याव्यात अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *