Breaking News

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे ते ट्विट आणि फडणवीस-राऊत यांची भेट पू्र्व नियोजित भेट असल्याचा दोघांकडून खुलासा

मुंबई: विशेष प्रतिनिधी

राज्यातील शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कसे कुचकामी आहे ? हे सिध्द करण्यासाठी भाजपाकडून जंगजंग पछाडले जात असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची काल भेट झाली. मात्र ही भेट गुप्त नव्हे तर सामनासाठी द्यायच्या मुलाखतीसाठी अटी निश्चित करण्यसााठी असल्याचा खुलासा फडणवीस आणि राऊत यांनी आज केला. परंतु या भेटीसाठी अजित पवारांचे ते ट्विट कारणीभूत असल्याची चर्चा महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये सुरु आहे.

२५ सप्टेंबर रोजी भाजपाचे श्रध्दास्थान असलेल्या पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंती दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटवरून अभिवादन करत भाजपाशी जवळीकीची शक्यता असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. मात्र एका तासानंतर सदरचे ट्विट अजित पवार यांच्या अकाऊंटवरून काढून टाकण्यात आले. परंतु शिवसेनेकडून या ट्विटरची गंभीर दखल घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीच थेट भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा देण्यात आल्याची चर्चा सध्या राजकिय वर्तुळात सुरु आहे.

मागील काही महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांचे पंख शरद पवार यांच्याकडून कापण्यात येत असल्याची चर्चा सातत्याने सुरु आहे. पक्षात अजित पवारांपेक्षा सध्या जयंत पाटील यांना अग्रक्रम देण्यात येत आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्यानंतर जयंत पाटील यांचाच शब्द अंतिम मानला जातो. तसेच अजित पवार यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचाही भाजपाकडेच ओढा आहे. त्यामुळे या दोघांकडून संधी मिळेल तेव्हा भाजपाला अनुकूल अशी भूमिका घेण्याची संधी सोडली जात नाही. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणणारी सुशांतसिंग राजपूत आत्महत्येचा तपास सीबीआयकडे द्यावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणे, सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे तपास हस्तांतरणाचा निर्णय दिल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ ट्विट करणे आदी गोष्टी मुळे त्यांचा भाजपाकडील ओढा मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येत आहे.

पार्थ पवारांच्या या राजकिय वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांना जाहीररित्या फटकारले. मात्र पार्थ पवार यांच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. त्यातच अधूनमधून उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांच्या राजकिय चालींना खो घालण्यासाठी भाजपाला अनुकूल भूमिका घेत असतात. काही दिवसांपूर्वी पुणे येथील जंबो कोविड रूग्णालयाच्या उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करून सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का दिला. त्यामुळे अजित पवार कधीही त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजपाच्या कळपात सामिल होवू शकतात अशी चर्चा नेहमीच भाजपाकडून आणि राजकिय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे अजित पवारांच्या त्या ट्विटमुळे शिवसेनेनेही भाजपाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधात कितीही रान उटविले तरी त्यांच्याशी फारसे ताणायचे नाही अशी भूमिका स्विकारली आहे. त्यातूनच भविष्यकालीन मैत्रीच्या उद्देशाने प्रवक्ते संजय राऊत यांच्या पुढाकाराने भेट घेतल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.

यासंदर्भात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, राऊत यांच्याबरोबरची भेट ही पूर्वनियोजित होती. आम्ही कुठलीही राजकिय चर्चा केली नाही. तसेच ही भेट सामना द्यावयच्या मुलाखतीसाठी होती असे स्पष्ट करत हे सरकार पाडून आम्हाला सत्तेत येण्याची घाई नाही. मात्र हे सरकार आपल्या अंतर्गत विरोधामुळे पडणार असल्याची भविष्यवाणी त्यांनी केली.

तर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनीही ही भेट सामना घ्यावयाच्या अटीच्या अनुषंगानेच होती असे सांगत राजकिय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.

मात्र एखाद्या प्रसारमाध्यमाला मुलाखत देण्यासाठी घेणारा आणि देणारा दोघांनी अटी ठरविण्यासाठी बैठक घ्यावी हा प्रकार कदाचित महाराष्ट्राच्या राजकिय इतिहासात पहिलाच प्रसंग असावा. परंतु महाविकास आघाडीचे सरकार असूनही अजित पवार हे जाणीवपूर्वक भाजपाशी जवळीक असल्याचे दाखवित असल्याने त्यास प्रत्तितुर म्हणून शिवसेनेने हे खेळी खेळल्याचे बोलल्याचे जात आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *