Breaking News

अजित पवार म्हणाले, कोरोना पासूनच्या बचावासाठी फक्त दोनच उपाय स्वेच्छेनं क्वारंटाईन होवून स्वत:ला आणि कुटुंबाला वाचविण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी

‘कोरोना’पासून बचावासाठी ‘होम क्वारंटाईन्‌’ किंवा ‘हॉस्पिटल क्वारंटाईन्‌’ हे दोनंच पर्याय आज उपलब्ध आहेत. ‘कोरोना’ संसर्गानं ‘हॉस्पिटल क्वारंटाईन्‌’ होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेनं ‘होम क्वारंटाईन्‌’ व्हावं, स्वत:चं आणि कुटुंबाचं संरक्षण करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

‘कोरोना’बाबत काहींच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णसंख्या वाढतेय, भाजी बाजारातल्या गर्दीमुळे ‘कोरोना’ तुमच्या घरात पोहचण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावगुंडांकडून पोलिसांवर हल्ले होत आहेत. या समाजविघातक घटनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. ‘कोरोना’संदर्भातील नियम मोडणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, त्याची  सुरुवात काल झाल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य शासनाने आवाहन केल्यानंतर अनेक खाजगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने, हॉस्पिटल सुरु केले आहेत. परंतु ज्यांनी त्यांचे दवाखाने अजूनही सुरु केलेले नाहीत, त्यांची नोंद राज्य शासनाने आणि स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. या डॉक्टरांवर निश्चित कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

राज्यात अन्नधान्याचा, खाद्यतेलाचा, दुध, भाजीपाल्याचा, औषधांचा, इंधनाचा मुबलक साठा आहे. या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कधीही बंद पडणार नाही. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी करु नये. दिल्लीतील ‘मरकज’ घटनेपासून धडा घेऊन यापुढे कुठलाही सामुदायिक मेळावा आयोजित करु नका, त्याला परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करत आज राज्यात रामनवमी भक्तीभावानं, साधेपणाने साजरी केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी  जनतेचे आभार मानले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *