Breaking News

केवळ पोलीस आयुक्तांची बदली नको, गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी
सचिन वाझे यांची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची बदली करून मोठी कारवाई केल्याचा आव आणला असला तरी ही कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे. राजकीय आशिर्वादामुळे एक पोलीस अधिकारी सरकारी यंत्रणा वापरून गुन्हे करत असल्याचे चित्र निर्माण झाले असून राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात आली आहे. सरकारने या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आवाज उठवला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत होते. पण आता एनआयएच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पोलीसच उद्योगपतीला धमकी देण्यासाठी स्फोटके ठेवत असतील तर जनतेने दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारने या स्थितीची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला पाहिजे. केवळ पोलीस अधिकाऱ्यावर बदलीची कारवाई करणे म्हणजे लोकांचा राग शांत करण्यासाठी केलेली किरकोळ उपाययोजना आहे. सरकारने या प्रकरणात मुळापर्यंत जायला हवे अशी मागणीही केली.

Check Also

राहुल गांधी यांची २४ एप्रिलला अमरावती व सोलापुरात जाहीर सभा

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघात काँग्रेस नेते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *