Breaking News

पोलिस भरती होवू इच्छिणाऱ्यांसाठी खुषखबर ! NCC प्रमाणपत्र असल्यास मिळणार गुण क्रिडा मंत्री सुनील केदार यांनी दिली माहिती

सध्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असून काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना आगामी काळात ७ हजार २३१ पदांवर पोलिस शिपाई भरती करणार असल्याचे जाहीर केले. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनातच एनसीसी प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये गुण देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मात्र ते गुण कसे देणार काय देणार याबाबत स्पष्ट केले नव्हते. यापार्श्वभूमीवर राज्याचे पदुम आणि क्रिडा मंत्री सुनील केदार एनसीसीचे प्रमाणपत्र असणाऱ्यांना भरतीत कसे गुण मिळणार याची माहिती दिली.

सुनिल केदार हे सध्या नागपूर दौऱ्यावर असून तेथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेना प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये अतिरिक्त गुण देण्यासंदर्भातील शासन निर्णय आणि राजपत्र देखील प्रसिद्ध झाले आहे.

राज्यात आगामी पोलीस भरतीमध्ये एनसीसीचं प्रमाणपत्र असलेल्या तरुणांना वाढीव गुण दिले जातील, अशी माहिती क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिली.

ज्या तरुणांकडे एनसीसी ए सर्टिफिकेट असेल, त्याला एकूण गुणांच्या २ टक्के अतिरिक्त गुण पोलीस भरतीसाठी मिळतील. बी सर्टिफिकेट असलेल्या तरुणांना एकूण गुणांच्या ३ टक्के मार्क मिळतील. सी सर्टिफिकेट असलेल्या तरुणांना एकूण गुणांच्या ५ टक्के मार्क मिळतील. या संदर्भातील जीआर काढण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नागपुरात २७ तारखेला एरो मॉडेलिंग शोचं आयोजन करण्यात आली असून नागपुरात आयोजित करण्यात येत असलेला हा शो विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.

या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नव चैतन्य निर्माण होणार आहे, उत्साह निर्माण होणार आहे. एनसीसीच्या माध्यमातून या शोचं आयोजन होणार आहे. नागपुरात माझ्या माहिती नुसार हा पहिला शो असणार आहे. कोरोनाच्या काळात जे विद्यार्थी घरी होते त्या विद्यार्थ्यांमध्ये या माध्यमातून उत्साह संचारेल. तर, हवाई क्षेत्रासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण होण्यासाठी हा शो फायदेशीर ठरेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

एमटीडीसीच्या निसर्गरम्य पर्यटक निवासांमध्ये ‘डेस्टिनेशन वेडींग’चीही पर्वणी पर्यटकांना निखळ आनंदाबरोबरच देणार सोयी-सवलती

आगामी मे महिन्याच्या सुट्यांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आखणी करीत असून पर्यटकांना अनुभवात्मक उपक्रमांबरोबरच …

Leave a Reply

Your email address will not be published.