Breaking News

उध्दव ठाकरेच्यां आश्वासनामुळे शेतकऱ्याने आत्महत्येचा विचार बदलला उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी मारूती कुदळेंनी केले स्वत:ला परावृत्त

मुंबई : प्रतिनिधी

देशात आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही म्हणून काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पत्र लिहीत आत्महत्या केल्याच्या घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आल्या. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर आत्मदहनाच्या विचारापासून शेतकरी पारावृत्त झाल्याची चांगली घटना नुकतीच उघडकीस आली.

मागील ८ ते ९ वर्षापासून उजनी धरणाच्या कालव्यात गेलेल्या जमीनीचा मोबदला मिळावा राज्य सरकारकडून मिळावा म्हणून आत्मदहनाचा इशारा दिलेल्या मारूती कुदळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर आत्महत्येचा विचार बदलला. त्यामुळे उस्माबादच्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्येच्या विचारापासून स्वत:ला परावृत्त केले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाठसांगवी या गावातील अनेक शेतकऱ्यांची उजनी धरणाच्या कालव्यासाठी जमीनीचे अधिग्रहण करण्यात आले. मात्र या अधिग्रहीत जमिनीचा मोबदला राज्य सरकारकडून मिळाला नसल्याने प्रकल्पबाधीत शेतकरी मारूती कुदळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात ३ मार्च, ६ मार्च आणि २१ एप्रिल २०१८ रोजी निवेदन दाखल करत मोबदला लवकरात लवकर देण्याची मागणी केली. तसेच जर हा मोबदला लवकर न दिल्यास आत्मदहनाचा इशारा राज्य सरकारला दिला. मात्र कुदळे यांच्या इशाऱ्याची सरकार आणि पोलिसांनी नेहमीप्रमाणे कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे अखेर या शेतकऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची २ मे २०१७ रोजी भेट घेतली.

त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी तुम्ही आत्महत्या करू नका सरकारकडून तुमच्या जमिनीच्या मोबदल्याचे पैसे वसूल करू असे सांगत शेतकऱ्यांना आश्वस्त केल्याचे प्रकल्पग्रस्त मारूती कुदळे यांनी सांगितले.

उध्दव ठाकरे यांच्या या आश्वासनानंतर अखेर मी आत्मदहन करण्याचा निर्णय बदलला. मात्र उशीराने राज्य सरकारला जाग आल्यानंतर पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. तसेच चौकशीसाठी पोलिस ठाण्याला बोलाविले. त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे आम्ही आत्मदहनाचा विचार बदलल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावर पोलिसांनी तसे लिहून देण्यास सांगितले. त्यानुसार पोलिस स्टेशनला लिहून दिल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *