Breaking News

निवृत्तीवेतन हवय तर ३० नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करा वित्त विभागाच्या लेखाधिकाऱ्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी
अखिल भारतीय सेवेतून निवृत्त तसेच राज्य शासकीय निवृत्ती/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी दि. १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ते ज्या बॅंकेतून निवृत्तीवेतन घेत असतील तिथे हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन वांद्रे येथील वित्त विभागाच्या उपअधिदान व लेखा अधिकारी रश्मी नांदिवडेकर यांनी केले आहे.
अधिदान व लेखा कार्यालय, वांद्रे, मुंबई येथून निवृत्तीवेतन/ कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांची यादी निवृत्ती वेतनधारकांच्या आद्याक्षरानिहाय बँकाकडे पाठवली आहे. निवृत्तीवेतनधारक ज्या बॅंकेतून निवृत्तीवेतन घेत असतील त्या बँकेत त्यांनी १ ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत प्रत्यक्ष हजर राहून यादीतील त्यांचे नाव पाहून, स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठ्याचा ठसा उमटवावा. पुनर्विवाह तसेच पुनर्नियुक्तीबाबत माहिती लागू असल्यास ती ही नोंदवावी.
बायोमॅट्रिक पद्धधतीनेही देता येईल जीवनप्रमाण दाखला
वरील पद्धतीशिवाय बायोमॅट्रिक पद्धतीनेही जीवनप्रमाण दाखला देता येतो. http://jeevanpramaan.gov.in या संकेतस्थळावर हा जीवनप्रमाण दाखला (डिजिटल लाईफ सर्टिफिकेट) सादर करण्याची सुविधा आहे. राज्य शासनातर्फे बायोमॅट्रीक पद्धतीने हयातीचा दाखला घेण्याची सुविधा राज्यातील कोषागार, उपकोषागार, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, राष्ट्रीयकृत बँका येथे उपलब्ध करून देण्यात येईल. सेवानिवृत्ती वेतनधारक व्यक्तीला तिथे जाऊन या सुविधेचा वापर करता येईल. त्यासाठी त्यांना या सुविधा केंद्रामध्ये त्यांची वैयक्तिक माहिती जसे त्यांचा पी.पी.ओ क्रमांक, नाव, मोबाईल क्रमांक, किंवा ई मेल आयडी इ. भरण्यासाठी मदत केली जाईल. त्यांचे बायोमॅट्रीक ऑथेन्टीकेशन पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या मोबाईलवर एस.एम.एस प्राप्त होईल.
अचूक नोंदवा पीपीओ क्रमांक
सेवानिवृत्ती धारकांनी पी.पी.ओ क्रमांक अचूक भरणे अत्यंत महत्वाचे आहे. जीवनप्रमाण पोर्टलवर नोंदणी करतांना निवृत्ती वेतनधारकांने त्यांचा निवृत्तीवेतन प्रदान आदेश क्रमांक बँकेत पाठवलेल्या यादीप्रमाणे अचूक नोंदवणे आवश्यक आहे.
अधिदान व लेखा कार्यालयातही सुविधा
जे निवृत्ती वेतनधारक अधिदान व लेखा कार्यालयात समक्ष उपस्थित राहून जीवनप्रमाण पोर्टलद्वारे जीवनप्रमाण संगणकीकृत हयातीचा दाखला सादर करू इच्छितात त्यांच्यासाठी अधिदान व लेखा कार्यालयातील निवृत्तीवेतन शाखेत तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
स्वीकृतीची घ्या माहिती
जीवन प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी जीवन प्रमाणपत्र संकेतस्थळावर पेन्शनर लॉगिन केल्यास डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची व कोषागारात स्वीकृतीची प्रक्रिया यशस्वी झाली किंवा कशी याची माहिती त्यांना मिळू शकेल.
मानसिक विकलांग तसेच शारीरिक दुर्बल निवृत्ती वेतनधारकांसाठी
मानसिक विकलांग, शारीरिक दुर्बलता असणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांच्या हयातीच्या दाखल्याच्या संदर्भात वैद्यकीय प्रमाणपत्रासह हयातीच्या दाखल्याचा नमुना संबंधित बँकेच्या शाखेकडून प्राप्त झाल्यानंतर संबंधित निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन सुरु करण्यात येईल.
तर डिसेंबर २०१८ पासून निवृत्तीवेतन होईल स्थगित
ज्या निवृत्ती वेतनधारकांनी यादीतील त्यांच्या नावासमोर स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा केला नसेल किंवा संगणकीकृत जीवनप्रमाण दाखला (डिजिटल लाईफ सर्टिफिकेट) सादर केला नसेल त्यांचे निवृत्तीवेतन डिसेंबर २०१८ पासून स्थगित करण्यात येईल, याची सर्व निवृत्ती वेतनधारकांनी नोंद घ्यावी असेही त्यांनी म्हटले आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *