Breaking News

सर्वाधिक गोंधळलेला राजकारणी म्हणजे उद्धव ठाकरे ! विरोधी पक्षनेते विखे पाटील यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी
केवळ सत्तेत कायम राहण्यासाठी म्हणून शिवसेनेने आपली अब्रू गमावली असून, त्‍यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणजे सर्वाधिक गोंधळलेला राजकारणी असल्याची बोचरी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना विखे पाटील यांनी हे विधान केले. उद्धव ठाकरे यांनी कालच अहमदनगरमध्ये केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेत्यांनी शिवसेनेच्या ढोंगी भूमिकेवर चौफेर हल्ला चढवला. ते म्हणाले की, आता जनतेप्रती शिवसेनेचा कळवळा म्हणजे एक मोठा जुमला झाला आहे. विरोधी पक्षांना सल्ला देण्यापूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकदा आपल्या फसव्या भूमिकेबद्दल आत्मचिंतन करावे. सरकारवर टीका करायची, मग मांडवली करायची, सत्तेचा मलिदा खायचा आणि पुन्‍हा त्‍याच सरकारवर टीका करायची, एवढीच शिवसेनेची मागील ४ वर्षातील कर्तबगारी राहिली आहे.
दुष्‍काळ जाहीर न झाल्यास रस्‍त्‍यावर उतरण्‍याच्या वल्गना उध्‍दव ठाकरे करीत आहेत. शेतकरी कर्जमाफी योजनेत घोटाळा झाला म्‍हणत राज्‍यभर फिरत आहेत. हे सारे घडत असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री काय फक्त भजे खायला उपस्थित असतात का? अशी विचारणाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. कर्जमाफी जाहीर झाली तेव्हा या योजनेतील ८९ लाख लाभार्थी शेतकऱ्यांची नावे उद्धव ठाकरे मोजून घेणार होते. पण या योजनेचा लाभ न मिळालेल्या राज्यातील सुमारे १ कोटी शेतकऱ्यांपैकी साधे ८९ शेतकरीही त्यांना मोजता आलेले नाहीत. त्‍यामुळे शिवसेनेची विश्‍वासार्हता आता संपली आहे. म्हणूनच आता रामाचा आधार घेवून उद्धव ठाकरे अयोध्‍येला निघाले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही ‘जय महाराष्ट्र’शिवाय अन्य कोणत्याही शब्दाने दसरा मेळाव्‍यातील भाषणाचा समारोप केला नाही. पण आज उद्धव ठाकरे यांच्यावर केवळ राजकीय अस्तित्वासाठी ‘जय श्रीराम’ म्‍हणण्‍याची वेळ आली आहे. त्यांनी अयोध्‍येला जाण्‍याची नौटंकी करण्‍याऐवजी जनतेच्‍या प्रश्‍नांबाबत प्रामाणिक असतील तर आजच सत्‍तेतून बाहेर पडून दाखवावे, असे आव्‍हान देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंना यावेळी दिले.
श्री साईबाबा समाधी शताब्‍दी वर्षाच्‍या समारोपीय कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान शिर्डीत आले असता या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी राजशिष्टाचारानुसार त्यांच्या स्वागताला गेलो. यावर कोणाला काय बोलायचे ते त्यांनी बोलावे. मी त्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही, असे सांगून विखे पाटील यांनी पंतप्रधानांचा शिर्डी दौरा अपेक्षाभंग करणारा ठरल्याची टीका केली. अवघा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघत असताना पंतप्रधानांचा दौरा ठरल्याने ते राज्यातील शेतकऱ्यांना भरीव दिलासा देतील, अशी अपेक्षा होती. शेतकरी आत्‍महत्‍या वाढतच आहेत. शेती उत्‍पादनाला भाव मिळत नाही. त्यातच दुष्‍काळाची तीव्रता भयावह झाल्याने पंतप्रधान काही ठोस निर्णय जाहीर करतील, असे वाटत होते. पण पंतप्रधानांनी महाराष्‍ट्रातील जनतेची घोर निराशा केल्याचा ठपका विखे पाटील यांनी ठेवला.

Check Also

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन वयाच्या ७२ व्या वर्षी कर्करोगामुळे घेतला शेवटचा श्वास

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांचे सोमवारी वयाच्या ७२ व्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *