Breaking News

उद्दीष्ट एकच, २०१९ ला भाजप आणि मित्र पक्षाला सत्तेवरून घालविणे साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मित्र लोकशाहीचे फोरमची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

मित्र लोकशाहीचे (Friends of Democracy) हा फोरम कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही.  तरीही त्याचे प्रमुख उद्दिष्ट मात्र राजकीय आहे. म्हणजेच आज केंद्रात सत्तेत असणाऱ्या मनुवादी व लोकशाही विरोधी भाजपा व त्याच्या मित्र पक्षास २०१९ मधील निवडणुकीमध्ये सत्तेतून पायउतार करणे, हेच ह्या फोरमचे  प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील इतर समविचारी संस्था, संघटना, समूह यांच्याशी सहकार्य करून या कार्याची व्याप्ती राज्य-भर पसरवण्यासाठी आम्ही कार्यरत राहणार असल्याची माहिती मित्र फोरमच्या सदस्यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी आम्ही निवेदन प्रसिध्दीस दिले होते. त्या निवदेनास वृत्तपत्रातून, सोशल मिडिया मधून  प्रसिद्ध झाल्यावर महाराष्ट्रातील अनेक स्तरांतून त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला. लोकशाहीविरोधी असणारे, भारताच्या सर्वसमावेशक एकात्मतेस व अखंडतेस हानीकारक असणारे सरकार आता पायउतार करायला हवे या मताशी सहमत असणार्‍या हजारो लोकांचा सकारात्मक प्रतिसाद या पत्राला मिळाला. त्याच प्रमाणात सरकार समर्थकांकडून विरोधही झाला. काहींनी या लोकांच्या आवाहनामुळे सरकारला काहीही फरक पडणार नाही, इथपासून ते हे सर्व सोळा लोक, बुद्धी-जीवी, विचारवंत व साहित्यिक केव्हा पासून झाले असा उपहासही केल्याचे मित्र लोकशाहीच्या सदस्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात बोलताना सांगितले.  सकारात्मक टीका करून आम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांना विरोध झाला असता तर तेही स्वागतार्ह झाले असते. परंतु त्या ऐवजी यथेच्छ भयंकर शिवीगाळच अधिक  करण्यात आला. आम्ही आमच्या निवेदनामध्ये ‘लोकशाही व अभिव्यक्तीचा आज समाजात संकोच होत आहे’ हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला होता. सरकार समर्थकांकडून आलेली  ही शिवीगाळ तोच मुद्दा पुन्हा एकदा सिद्ध करणारी  ठरली. आमच्या विचारांना दुजोरा देत काही जणांनी केवळ पत्रक आणि निवेदन देऊन चालणार नाही तर सरकारच्या यंत्रणेच्या विरोधात कार्य कसे होऊ शकेल यासंबंधी विचार होण्याची गरज व्यक्त केली होती.

आम्ही गेल्या काही दिवसांत लोकांच्या प्रतिसादावरून, समर्थनांतून लोकांच्या मनातील अनेक प्रश्नांचा अभ्यास करून, निव्वळ निवेदन व पत्रकांपुरते मर्यादित न राहता हया कार्यास मूर्त  स्वरूप देण्यासाठी  Friends of Democracy’ ‘मित्र लोकशाहीचे’ असा फोरम स्थापन केल्याचे आज २५  एप्रिल २०१८ रोजी, आपल्या सर्वांच्या माध्यमातून जनतेसमोर जाहीर करत आहोत.

कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य नसलेल्या, कोणत्याही व्यक्तीस या फोरममध्ये सहभागी होऊन कार्य करता येईल. हे सर्व कार्यकर्ते या फोरमशिवाय स्वतंत्रपणे किंवा त्यांच्या एखाद्या अशाच समूहा मार्फत सरकारच्या विरोधात कार्य करू शकतील.

सरकाराविरूद्ध जागो-जागी जन-आंदोलने उभी राहावीत, मनुवादी विचार भारतीयत्त्वाच्या संकल्पनेला तडा देणारा कसा आहे, तसेच सध्याचे सरकार देशाचा लोकशाही ढाचा खिळखिळा करण्याचा जो प्रयत्न करत आहे त्या बद्दल जनतेत जागृती व्हावी ह्यासाठी  Friends of Democracy कार्यरत राहील. मागील चार वर्षात सरकारच्या विविध क्षेत्रातील अपयशाबाबत विषय-वार मांडणी करणारे लेखन सातत्याने या फोरमतर्फे येत्या काळात केले जाईल. वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक न्यूज चॅनल्स, सोशल मिडीया यांच्या बरोबर प्रत्यक्ष जनतेशी संवाद साधणार्‍या परीषदा, व्याख्याने, बैठका , यांचेही नियोजन आम्ही करणार आहोत.

येत्या काही दिवसात हा फोरम महाराष्ट्रातील अनेक शहारांमध्ये आपल्या शाखा तयार करेल. या नंतर जिल्हा व तालुका पातळीवर हे कार्य नेण्याचा आमचा प्रयत्न राहील. लोकशाहीवर दृढ निष्ठा असणार्‍या आणि संविधानाचे संरक्षण हे आपले कर्तव्य मानणार्‍या राज्यातील संवेदनशील नागरिकांना आम्ही पुढे येऊन  ‘मित्र लोकशाहीचे’ ह्या फोरमची साथ देण्यासाठी आणि आपापल्या शहरांत, गावात जनतेला जागृत करण्याचे हे कार्य तातडीने सुरू करण्यासाठी आम्ही ह्या पत्रकार परिषदे द्वारा आवाहनही या फोरम तर्फे करण्यात आले.

Check Also

भ्रष्टाचारप्रकरणी अब्जाधीश महिलेला व्हिएतनाममध्ये थेट फाशीची शिक्षा

व्हिएतनामी रिअल इस्टेट उद्योजिका ट्रुओंग माय लॅन याला देशाच्या सर्वात मोठ्या फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात हो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *