Breaking News

पवार म्हणाले, परमबीर सिंग भेटले मला पण बदलीनंतर, उद्या देशमुखांचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बोलणार

मुंबई: प्रतिनिधी

आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर मला परमबीर सिंग हे येवून भेटल्याचे स्पष्ट करत ते भेटले बदली झाल्यानंतर, परंतु त्यात तपासात हस्तक्षेप होत असल्याबाबत बोलले. त्यात कोठेही पैशांचा उल्लेख नव्हता. त्याचे पत्र मलाही मिळाले त्यात माझा उल्लेख करण्यात आला. मात्र त्या पत्रावर त्यांची सही नाही. त्यांनी केलेले आरोप हे गंभीर स्वरूपाचे असून देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे असे सांगत निवृत्त पोलिस महासंचालक ज्युलिओ रिबेरो यांच्या नेतृत्वाखालील समितीने ही चौकशी करावी अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.

देशमुख यांच्या गृहमंत्री पदाबाबत उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेले आरोपमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यामुळे याप्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. या प्रकरणात गृहमंत्र्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. परमबीर सिंग मलाही भेटले होते. पण, त्यांनी फक्त त्यांच्या बदलीबद्दल म्हणणं मांडलं होतं. त्याचबरोबर माझ्या खात्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचं म्हटलं होतं. त्यापलीकडे त्यांनीही मला काहीही सांगितलं नाही. पत्रकार परिषदेपूर्वीच माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे. देशमुख यांच्याबद्दलचा निर्णय सर्वांशी बोलून घेतला जाईल. यासंदर्भातील सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यांनी योग्य ती चौकशी करून निर्णय घ्यावा. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना पुन्हा पोलिस दलात सामावून घेण्याचा निर्णय सर्वस्वी परबीर सिंग यांचाच होता. त्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे किंवा गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कोणताही सहभाग नव्हता असे स्पष्ट करत सचिन वाझे याची जबाबदारी सिंग यांच्यावर सोपविण्यात आली.

सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांचाच होता. गृहमंत्र्यांनी दर महिन्याला १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप या पत्रात आहे. त्यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना आणि मला पाठवलं आहे. यात पैसे गोळा कसे केले जातात आणि ते कुणाकडे दिले जाते यात नमूद करण्यात आलेलं नाही. देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर ते पत्र समोर आलं. हे संपूर्ण प्रकरण गंभीर आणि संवेदनशील बनत आहे. त्यामुळे याची एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी. राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र महाविकासआघाडी सरकार स्थिर आहे. याचा कोणताही परिणाम सरकारवर होणार नसल्याचं त्यांनी शेवटी सांगितले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी उद्या बोलणार असल्याने पवारांनी स्पष्ट केल्याने अनिल देशमुख राहणार की जाणार हे उद्याच कळणार आहे. त्यामुळे देशमुखांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम राहणार आहे.

Check Also

कर्जबुडव्या कारखान्यांना पायघड्या, संकटग्रस्त सामान्यांची उपेक्षा! भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबईः प्रतिनिधी सहकारी साखर कारखान्यांनी व अन्य सहकारी संस्थांनी थकविलेली ३८०० कोटींची देणी सरकारी तिजोरीतून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *