Breaking News

अजित पवार यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील दाव्यानंतर छगन भुजबळांकडून ओबीसी कार्ड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पायाभरणी करताना शरद पवारांनी काँग्रेसमधील अनेक मातब्बर मराठा नेत्यांना साथीला घेतलं. पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील अशा मुरब्बी नेत्यांसोबतच तरूण नेत्यांचीही पवारांना साथ लाभली. जयंत पाटील आर.आर.पाटील, दिलीप वळसे पाटील ते राजेश टोपे शरद पवारांनी यांसारख्या उमद्या मराठा नेत्यांना ताकद दिली.. पवारांनी घडवलेल्या मराठी नेत्यांची यादी तशी मोठीच आहे. म्हणूनच पवारांवर मराठा वर्चस्वाचं राजकारणाचा आरोप केला जातो. मात्र सत्तेच्या आणि संघटनेच्या पदांवर इतर घटकांची वर्णी लावून पवारांनी प्रतिकात्मक राजकारण घडवून आणलं आणि समतोल राखण्याचा प्रयत्न केला. आणि आता याच प्रतिकात्मक मुद्द्याचं हत्यार छगन भुजबळांनी उपसलंय.

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अजित पवारांकडून संघटनात्मक जबाबदारीची मागणी करण्यात आली. पण बहुतांश काळ सत्तेच्या पदांवर असलेल्या अजित दादांच्या या मागणीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अजितदादांनी संघटनात्मक पदाची मागणी करताच छगन भुजबळांनी ओबीसी प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी केली आहे. अजितदादांनी थेट प्रदेशाध्यक्ष पदावर दावा केला नसला तरी त्यांचा रोख सर्वांच्या लक्षात आलेला आहे. पण राष्ट्रवादीत जातीय समतोल साधण्यासाठी अनेकदा पदांची फेरबदल झाल्याचं विसरून चालणार नाही.

आता अजितदादांनी संघटनात्मक पदाची मागणी केल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदावरून रस्सीखेच होण्याची शक्यता असतानाच छगन भुजबळांनी ओबीसीचा मुद्दा तापवलाय. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसनं भुजबळांना तर प्रदेशाध्यक्ष म्हणून संधी दिली. शिवाय २०१५ ते २०१८ मध्ये सुनील तटकरे यांनीही प्रदेशाध्यक्ष पद भूषवलं. आता पुन्हा ओबीसी प्रदेशाध्यक्ष करण्याच्या भुजबळांच्या मागणीमुळे कार्यकाळ पूर्ण झालेल्या जयंत पाटलांची अधिकची संधी हातून जाऊ शकते. आणि ओबीसी प्रदेशाध्यक्ष करायचाच झाल्यास अजितदादांचंही नुकसान अटळ आहे.

एकंदरीतच छगन भुजबळ यांची मागणी अजितदादांची अडचण वाढवणारी आहे. अजितदादांच्या प्रयत्नांवर पाणी फेरण्यासाठी भुजबळांनी गुगली टाकली नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *