Breaking News

मान्सून आणखी दोन दिवसांनी मुंबईसह राज्यात जोरात बरसणार

केरळमध्येच उशिराने दाखल झालेला मान्सून आता सगळीकडेच आपला लेटमार्क देत आहे. आतापर्यंत मान्सूनने महाराष्ट्र व्यापायला हवा होता. मात्र, अद्याप मान्सूनची चाहूल न लागल्यामुळे शेतकरीदेखील चिंतेत आहे. अशात तळ कोकणात आल्यानंतर अरबी समुद्रात धडकलेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा वेग मंदावला आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेचा तडाका जाणवायला लागला.

शेतकऱ्यांची कामं खोळंबलेली असताना सर्वसामान्यांनाही पावसाची आस आहे. अखेर यासर्व परिस्थितीमध्ये दिलासा देणारी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मान्सून नेमका कधी सक्रिय होणार याबाबत हवामान खात्याने नवा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या किनारी पट्ट्यामध्ये सक्रिय होईल. मराठवाड्यातही यामुळे ढगांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर पुढच्या दोन दिवसात म्हणजे २४ आणि २५ जूनला पावसाचा जोर वाढेल, असाही हवामान खात्याचा अंदाज आहे.

सध्या मोसमी वाऱ्यांच्या प्रवासासाठी पोषक वातावरण तयार झालं असून येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मान्सून सर्वत्र सक्रिय झाल्याचे पाहायला मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनीही पावसाचा अंदाज घेत पेरणीला सुरुवात करावी, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुंबईतही पाऊस कधी पडेल? अशाच अपेक्षेत सगळेजण आहेत. अशात मान्सून सध्या मुंबईच्या उंबरठ्यावर असून २४ जून रोजी तो मुंबईत दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

चक्रीवादळामुळे दक्षिणेकडून येणाऱ्या नैऋत्य मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग काही काळासाठी मंदावला. दुसरीकडे पूर्वेकडील वाऱ्यांची गती नियमित होती. त्यामुळे यंदा मान्सून चंद्रपूरमार्गे विदर्भात लवकर शिरण्याची शक्यता असल्याचे मत काही हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हवामान विभागाच्या मुंबई आणि नागपूर केंद्राने यासंबंधी माहिती दिली आहे.

नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, बीड, सोलापूर, लातूर, नांदेड, जालना, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे तर गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मात्र आज तीव्र उष्णतेच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागतील. या ठिकाणी आज हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना हवामान खात्याचा अंदाज जाणून घेतच घराबाहेर पडा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Check Also

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “चला जाणूया नदीला” दुसऱ्या टप्प्यातील अभियान लवकरच

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २ ऑक्टोबरला प्रारंभ झालेल्या “चला जाणूया नदीला ” अभियानांतर्गत नदी संवाद यात्रा आता राज्यभर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *