Breaking News

जयंत पाटील म्हणाले, अशोक चव्हाण यांनी जो गौप्यस्फोट केला त्यात तथ्य… मराठा समाजाबद्दलचे तानाजी सावंतांचे वक्तव्य तीच भूमिका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची...

२०१४ साली अशोक चव्हाण यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन शिवसेना – कॉंग्रेस आघाडीबाबत चर्चा केली असा अशोक चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला असेल तर त्यात तथ्य असणे स्वाभाविक आहे, असे मत व्यक्त करतानाच सध्या मुख्यमंत्र्यांनी जी युती केली आहे ती कशासाठी केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे असा टोलाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.
आदरणीय शरद पवारसाहेबांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक पार पडल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पंकजा मुंडे यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न मागील काही वर्षात सुरू आहे…
पंकजा मुंडे यांना भाजपा म्हणावे तितके महत्त्व देत नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यांना थोडंसं बाजूला काढण्यात आले आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपा वाढवण्यासाठी मोठे कष्ट घेतले. मुंडे साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, पंकजा मुंडे यांनाही तो वर्ग पाठिंबा देतो. त्यामुळे त्यांचे महत्त्व कमी करण्याचे काम मागील काही वर्षात सुरू आहे म्हणून त्यांनी आपले मत खंत म्हणून व्यक्त केले आहे असेही ते म्हणाले.

मराठा समाजाबद्दलचे तानाजी सावंतांचे वक्तव्य तीच भूमिका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची
मराठा तरुणांबद्दल आणि समाजाबद्दल मंत्री तानाजी सावंत यांनी वक्तव्य केले ते अत्यंत धक्कादायक आहे. तीच भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आहे फक्त ते मांडत नाहीत तानाजी सावंत ते मांडत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.
आता मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना कमी बोलण्यास सांगितले असले तरी माणसाचा स्वभाव जात नाही. इथे तर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक एकत्र झाले आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी सांगितले तरी माईक समोर आल्यावर मनातल्या सगळ्या गोष्टी व्यक्त करण्याची प्रथा आणि इच्छा बर्‍याच जणांची जागृत होताना दिसते असा खोचक टीकाही त्यांनी तानाजी सावंत यांच्यावर केली.

गॅसचा व्यवसाय मोदी सरकार करतंय; सिलेंडर वापरावर बंधन आणणे म्हणजे खुल्या बाजाराला प्रोत्साहन
सुरुवातीला मोदी सरकारकडून सर्वांना गॅस सिलेंडर वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. त्यानंतर सर्वांनी सिलेंडर घेतल्यावर सबसिडी कमी करण्यात आली म्हणजे गॅसचा व्यवसाय मोदी सरकार करतंय असं वाटायला लागले आहे असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.
आता सिलेंडर वापरावर बंधन आणणे म्हणजे खुल्या बाजारात जो दर असेल (उदाहरणार्थ दोन – अडीच हजार रुपये ) त्याच दरात जनतेने गॅस सिलेंडर खरेदी करावा लागणार आहे असा त्याचा अर्थ आहे. मात्र या सरकारच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनतेला व मध्यमवर्गीय नागरिकांना फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे अशी शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

नितीन गडकरी यांनी खरे बोलण्यापेक्षा वस्तुस्थितीचं वर्णन केले…
नितीन गडकरी यांनी खरे बोलण्यापेक्षा वस्तुस्थितीचं वर्णन केले आहे. देशात ज्याच्याकडे भांडवल जास्त आहे. त्याला महत्व प्राप्त झाले आहे. श्रीमंत लोकांची संख्या मूठभर आहे आणि गरीब लोकांची संख्या प्रचंड मोठी आहे. आपल्या देशाची संपत्ती ठराविक लोकांच्यामध्ये वाटली गेली आहे. देशातील फार मोठा वर्ग हा संपत्तीपासून लांब राहिला आहे. त्यामुळे श्रीमंत आणि गरीब याच्यातील दरी ही मागच्या काळात जेवढी होती ती मागील सात – आठ वर्षांत वाढलेली दिसत आहे. असा निष्कर्ष अनेक अर्थतज्ज्ञांनी काढला आहे. तेच पुन्हा नितीन गडकरी आपल्या भाषणात आणि वक्तव्यातून बोलत आहेत असेही ते म्हणाले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *