Breaking News

शिंदे गटाच्या दाव्यावर सरन्यायाधीशांचे मोठे विधान, १० व्या परिशिष्टानुसार त्याला काही महत्व नाही.. दिलेल्या तारखानुसार पक्षात २१ जूनपासूनच फूट दिसतेय

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुरू असलेल्या सुनावणीत शिंदे गटाकडून आक्रमक युक्तिवाद करत ठाकरे गटाचे मुद्दे खोडले जात आहेत. अशातच आज बुधवारी सुनावणीत शिंदे गटाच्या वकिलांनी मांडलेला एक मुद्दा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नाकारला आहे. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी १० व्या परिशिष्टाचा संदर्भ देत आपले मत व्यक्त केले.
सर्वोच्च न्यायालयात आज शिंदे गटाने आपली बाजू मांडताना विधिमंडळात पक्षाचा गटनेताच पक्षाची भूमिका ठरवित असल्याचा दावा केला. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डि.वाय.चंद्रचूड यांनी १० व्या परिशिष्टाचा संदर्भ देत शिंदे गटाचा दावा नाकारला.

शिंदे गटाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, दहाव्या परिशिष्टाचा संदर्भानुसार विरोधी गटानं पक्षात असल्याचा दावा केला काय किंवा नव्या पक्षाची स्थापना केल्याचा दावा केला काय, त्यानं काही फरक पडत नाही. तुम्ही दिलेल्या तारखांनुसार दिसतंय की, पक्षामध्ये २१ जूनपासूनच फूट होती.

फूट झाल्यानंतर ज्या लोकांनी फूट पाडली, ते कदाचित पक्षात राहतील किंवा बाहेर पडतील, पण त्याही परिस्थितीत तो गट त्याच पक्षात राहून काम करू शकेल. तुम्ही ठाकरे गटाला अल्पसंख्य आणि शिंदे गटाला बहुसंख्य म्हणताय, पण दहाव्या परिशिष्टानंतर त्याला काही अर्थ राहात नाही, असं निरिक्षण नोंदविले.

यावेळी शिंदे गटाचे वकील नीरज कौल म्हणाले, आम्ही कधीच म्हटलं नाही की, विधिमंडळ आणि राजकीय पक्ष वेगवेगळे असतात. विधिमंडळ पक्षनेता राजकीय पक्षासंदर्भातले निर्णय विधिमंडळात घेत असतो. फूट पडली असली, तरी राणा प्रकरणातील निकालानुसार विधानसभा अध्यक्ष एका सदस्याविषयी निर्णय घेऊ शकत नाहीत. कोण प्रतोद आहे हाच अध्यक्षांचा मुद्दा असतो. आमच्या मते विधिमंडळ गटाकडे राजकीय पक्षाचे राजकीय अधिकार असतात. विधिमंडळ पक्षच विधानसभा अध्यक्षांना व्हीपबाबत कळवतात, असा युक्तीवाद केला. तसेच सर्वोच्च न्यायालयासमोर महाराष्ट्र विधिमंडळातील नियम वाचून कौल यांनी वाचून दाखवले.

यावेळी युक्तीवाद करताना शिंदे गटाचे वकील कौल म्हणाले, विधानसभा अध्यक्ष फक्त विधिमंडळ नेते काय सांगतायत यावरच लक्ष देतात. त्यांच्याकडे नेमकी ही पक्षाची भूमिका आहे की नाही हे बघण्याचे कोणतेही इतर मार्ग नाहीत. ठाकरे गटाचं म्हणणं आहे की ते फक्त विधिमंडळ गट आहेत. पण हे कोण ठरवणार? त्यांचं म्हणण की जे काम निवडणूक आयोगाचं आहे, ते काम विधानसभा अध्यक्षांनी करावं, असं म्हणत नीरज कौल यांनी ठाकरे गटाला टोला लगावला.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *