Breaking News

उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस राड्याचा बारामतीत राष्ट्रवादी आणि भाजपात तर घाटकोपर आणि बोरीवलीत भाजपा नेत्यांच्या समर्थकात

मुंबईः प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीकरीता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना विद्यमान आमदार-मंत्री यांना तिकिट नाकारल्याने बोरीवली आणि घाटकोपरमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत राडा केला. तर बारामतीत भाजपा उमेदवार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या रँलीवरून राष्ट्रवादी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे दिसून आले.
बोरीवलीचे विद्यमान आमदार विनोद तावडे यांना भाजपाची उमेदवारी न देता ती बाहेरून आयात केलेल्या सुनील राणे यांना दिली. त्यामुळे स्थानिक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी बोरीवली भाजपा कार्यालय आणि खासदार गोपाळ शेट्टी यांच्या कार्यालयात घेराव घालून स्थानिक उमेदवार द्या अथवा तावडेंनाच उमेदवारी द्या अशी मागणी केली. अखेर विनोद तावडे यांनी कार्यकर्त्यांची भेट घेवून त्यांना समजाविण्याचा अथक प्रयत्न केला.
तर घाटकोपरमध्ये विद्यमान आमदार तथा वादग्रस्त माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांना उमेदवारी डावलत पराग शहा यांना जाहीर झाली. तसेच उमेदवारी अर्ज भरण्याआधी ते महेता यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता तेथील महेता यांच्या समर्थक आणि शहा यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला. या राड्यांमध्ये शहा यांच्या गाडीची तोडफोड झाली.
तर भाजपाचे बारामतीतील उमेदवार गोपीचंद पडळकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीने जाणार होते. मात्र त्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले. त्यामुळे भाजपा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे चित्र बारामतीत पाह्यला मिळाले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *