Breaking News

जयंत पाटील म्हणाले, चौकशा लावून आवाज दाबण्याचा प्रयत्न दबावाला आपण कडाडून विरोध करू आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देऊ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भविष्यात मोठी संधी आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होईल म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम केले जात आहे. चौकशा लावून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. या दबावाला आपण कडाडून विरोध करू आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देऊ असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सध्या जळगांवसह उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यावर आहेत. आज जळगांव जिल्ह्यात त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे ही उपस्थित होते.

लोकांमध्ये जा, त्यांचे प्रश्न जाणून घ्या, क्रियाशील कार्यकर्ते आपल्या भागात तयार करा, आपापसातील वाद बंद करा आणि आपली संघटना मजबूत करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना परिवार संवाद यात्रा काढण्यात आली होती. तेव्हा या महाराष्ट्रात पवारसाहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे ही गोष्ट जाणवली होती. एक मोठा विचार आपल्याकडे आहे. या आधारावर आपल्याला ही संघटना फार व्यापक करता येईल. यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करायला हवे असे मतही व्यक्त केले.

बुथ कमिट्या पूर्ण करा, संघटना सक्षम करा, सदस्यता नोंदणी पूर्ण करा. आपल्या पक्षाची वाढ कशी होईल यासाठी आपण प्रयत्न करायला हवे असे आदेश देतानाच जळगाव जिल्ह्यातील आपल्या अनेक उमेदवारांची थेट लढत ही शिवसेनेशी होती. शिवसेनेच्या निवडून आलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. पक्षांतर केलेले लोकांना कधीही आवडत नाही. त्यामुळे लोकांच्या मनात या आमदारांप्रती मोठा राग आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल सत्ताधाऱ्याच्या विरोधात गेल्यास काही महिन्यातच निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण संघटनात्मक बांधणी करत राहिले पाहिजे. आपले घड्याळ घराघरात पोहोचले पाहिजे असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले.

गुरुवारी राज्याचे अधिवेशन संपले. अनेक ठिकाणी अतिवृष्टीने शेतकरी त्रस्त होते. सरकार लक्ष देत नव्हते आम्ही सभागृहात संघर्ष केला आणि शेतकऱ्यांना मदत करण्यास भाग पाडले. त्यामुळे आता तुम्हीही जोमाने संघर्ष करा असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

जळगाव येथे ज्या सूचना आल्या त्या सुचनांचा नक्कीच विचार केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार सतीश पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, रोहिणीताई खडसे, संतोष चौधरी, मनिष जैन, जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, दिलीप सोनवणे, युवक अध्यक्ष रवींद्र पाटील, महानगर अध्यक्ष अशोक वंजारी आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसात सहा सभा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत २९ व ३० एप्रिल रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *