Breaking News

गृहमंत्र्यांच्या कामकाजशैलीवरून आक्रमक झालेल्या संजय राऊतांचे रात्री घुमजाव दिलीप वळसे-पाटलांची भेट आणि संजय राऊतांची माघार

नागपूरचे अॅड सतीश उके यांना ईडीने अटक केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीकेचा भडीमार केला. त्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी थेट गृहमंत्री पद सांभाळणारे दिलीप वळसे-पाटील यांच्यावर निशाणा साधला. मात्र दिलीप वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची दोन वेळा भेट घेतल्यानंतर मात्र संजय राऊत यांची भूमिका म्यान झाल्याचे दिसून आले.
शिवसेना प्रवक्ते संजय राऊत सकाळी बोलताना म्हणाले की, लढायची गरज नाही, महाराष्ट्राच्या पोलिसांना काही सूचना मिळाल्या तर काम होऊ शकेल. राज्याच्या गृहखात्याने अधिक सक्षम होणे गरजेचे आहे, एवढे मी सांगतो. काल मुख्यमंत्र्यांशी माझी या विषयावर चर्चा झाली. ज्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणा घुसत आहेत. ते खरं म्हणजे महाराष्ट्राच्या गृहखात्यावर आक्रमण आहे, हे समजून घ्या. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था, पोलीस व्यवस्था ज्यांच्याकडे आहे त्यांनी याकडे फार गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. या प्रकाराकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे. आस्ते कदम भूमिका कोणी घेत असेल तर ते स्वत:साठी फाशीचा दोर वळत आहेत. आता गृहखात्यालाच दमदार पावलं टाकावी लागतील नाही तर तुम्ही तुमच्यासाठी रोज नवा खड्डा खोदाल, असा इशारा दिलीप वळसे-पाटील यांना नाव न घेता दिला.
योग्यवेळी अशा गुन्हेगारांच्या कॉलरला हात घालायचा अशा राजकीय गुन्हेगारांच्या हात घातला जाईल. भाजपाच्या दबावामुळे केंद्रीय यंत्रणा जशा कारवाया करतात तशा आम्ही कारवाया करू असे अजिबात नाही. आमचे राज्य कायद्याचे आहे. ज्या गोष्टी आहेत, त्या कायद्याच्या चौकटीत होतील. सूडाने आणि बदल्याच्या भावनेने काहीच होणार नाही. योग्यवेळी कायदेशीर मार्गाने ज्यांच्या कॉलरला हात घालायचे तो घातला जाईल, असंही ते म्हणाले.
पंतप्रधान कार्यालयाला मी पुराव्यासह कळवले आहे. हा विषय केंद्रीय तपास यंत्रणेशी संबंधित आहे. पंतप्रधान कार्यालय नेहमी भ्रष्टाचार मुक्त भारताची भाषा करते म्हणून सगळयात आधी त्यांच्याकडून काय कारवाई होते याकडे लक्ष ठेवून आहे. महाराष्ट्रातील यंत्रणांकडे मी जी कागदपत्रे दिली आहे, त्यासंदर्भात काय कारवाई झाली हे तुम्हाला लवकरच दिसेल, असंही ते म्हणाले. खासदार म्हणून मी काही कागदपत्रे देतो किंवा भूमिका मांडतो तेव्हा त्यांना माझ्या कागदपत्रांची दखल घ्यावी लागेल. या देशात आजही संसदेल, संसद सदस्याला त्याने दिलेल्या पुराव्याला महत्त्व आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
कारवाई होणं म्हणजे पोलिसांनी उठून जावे आणि कारवाई करणे असे नाही. मी कुणाचही नाव घेतले नाही. पण पुरावे दिले आहेत. पोलिसांना तपास पूर्ण करू द्या. शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण कोणत्याही निरपराधावर चुकीची कारवाई होऊ नये हे आमच्या संविधानाचं ब्रीद वाक्य आहे ते आम्ही पाळतो असे वक्तव्य त्यांनी दुपारी बोलताना केले.
तसेच सतीश उकेंवर झालेल्या कारवाईवर काही म्हणणं नाही पण त्यात केद्रीय तपास यंत्रणांचा हस्तेक्षप आल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. राज्याच्या पोलिसांना योग्य सूचना, मार्गदर्शन मिळालं तर काम होऊ शकेल. गृहखात्याने अधिक सक्षम आणि कठोर होणं गरजेचं आहे. माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा घुसत आहेत हे गृहखात्यावरील आक्रमण आहे. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था, तपास यंत्रणा ज्यांच्या अख्त्यारित आहे त्यांनी यावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. कोणी ‘आहिस्ते कदम’ भूमिका घेत असेल तर ते स्वत:साठी फाशीचा दोर वळत आहेत. गृहखात्याला दमदार पावलं टाकावी लागतील, अन्यथा तुमच्यासाठी रोज एक नवा खड्डा खणाल,” असा इशारा संजय राऊतांनी दिला होता.
त्यानंतर रात्री प्रसारमाध्यमांशी बोलताना मात्र संजय राऊत यांनी आपल्या दिवसभरातील वक्तव्यावरून घुमजाव घेत दिलीप वळसे-पाटील हे चांगले मंत्री असून ते योग्य पध्दतीने काम करत असल्याचा निर्वाळा देत नाराजी वगैरेच्या बातम्या या निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट करत निर्माण झालेल्या राजकिय गोंधऴावर पडदा टाकला.

Check Also

हिंदू सण बंदीवरून शरद पवार म्हणाले, पंतप्रधानांचे राष्ट्रीय धोरण महाराष्ट्राने पाळले फडणवीस आणि भाजपाच्या टीकेला दिले प्रत्युत्तर

आज एका वर्तमान पत्रामध्ये पहिल्या पानावर एनडीएच्या कारकीर्दीत ईडीने किती जणांवर कारवाया केल्या. कोणत्या राजकीय …

Leave a Reply

Your email address will not be published.