Breaking News

वाघ आणि सिंह एकत्र ? सध्या शिवसेनेचा विषय अजेंड्यावर नाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांचा खुलासा

मुंबई : प्रतिनिधी

आगामी २०१९ च्या निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनंतर नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघ आणि सिंह हे एकत्र असल्याचे जाहीर करत शिवसेनेबरोबरील भाजपची युती कायम राहणार असल्याचे जाहीर केले. मात्र त्यास काही दिवसांचा अवधी जात नाही तोच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेबरोबरील युतीचा विषय सध्या पक्षाच्या अजेंड्यावर नसल्याची भूमिका जाहीर करत शिवसेनेबरोबरील युतीबाबत स्पष्टपणे बोलण्याचे टाळले.

६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस असून मागील दोन वर्षी पक्ष स्थापनेच्या दिवशी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्थानिकस्तरावर मेळावे घेण्यात आले. मात्र यंदाच्यावर्षी आगामी निवडणूका लक्षात घेवून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर महामेळावा घेण्यात येत आहे. त्यासंदर्भात करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती देण्यासाठी दादर येथील वसंत स्मृती येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यात भाजप आणि शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी शिवसेना वारंवार विरोधकांच्या भूमिकेत दिसत आहे . सेनेच्या सामना या मुखपत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. शिवसेनेने स्वबळाची घोषणा केल्यानंतर नुकतेच एनडीएचा घटक पक्ष असलेल्या तेलगु देसमने भाजपवर नाराजी व्यक्त करत एनडीएला रामराम ठोकला. त्यामुळे एनडीएतील घटक पक्षांना रोखून धरण्यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र याबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते खुलेपणाने बोलण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, या महामेळाव्यासाठी राज्यभरातून पक्षाचे किमान तीन लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार असून या मेळाव्यानंतर कार्यकर्ते नव्या उमेदीने कामाला लागतील व पक्षाला यश मिळवून देतील असा विश्वास व्यक्त करत राज्यातून २८ रेल्वेगाडयांनी कार्यकर्ते मुंबई दाखल होणार आहेत. तसेच बसेस, जीप, कार इत्यादी पन्नास हजार गाड्यांनी कार्यकर्ते येणार आहेत. मुंबईत येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या व्यवस्थेसाठी आशिष शेलार आणि त्यांची टीम काम करत असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली.

या महामेळाव्यासाठी अमित शाह यांच्याबरोबरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वांद्रे येथे असले तरी शाह ठाकरेंना भेटणार नाहीत

भाजपच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे वांद्रे येथील बीकेसीमध्ये जाहीर सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र तरीही ते या कालावधीत उध्दव ठाकरे यांना भेटणार नसून त्यांच्या भेटीची तशी कोणतीही वेळ ठरविण्यात आलेली नसल्याची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष अँड. आशिष शेलार यांनी दिली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *