Breaking News

शरद पवारांनी, खडी फोडण्याचे काम केल्याची आठवण सांगत दिला राष्ट्रवादीला रोडमॅप ८१ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात पवारांनी दिला समाजकारणाचा मुलमंत्र

मराठी ई-बातम्या टीम

ब्रिटीशकाळात एकदा तेव्हांचे राजे प्रिन्स चार्लस हे भारत भेटीवर आले होते. त्यावेळी आयोजित कार्यक्रमासाठी ते ज्या ठिकाणी जाणार होते. त्या ठिकाणी एक व्यक्ती डोक्याला मुंडासे गुंडाळून तेथे गेले. तेथेही अनेक लोक त्या राजांना पाहण्यासाठी आले होते. तो राजा आल्यानंतर पोलिसांनी सर्वांना एकाबाजूला केले. त्यात ते मुंडासे बांधलेली व्यक्तीही होती. त्यानंतर त्या राजांनी त्या मुंडासे बांधलेल्या व्यक्तीबद्दल विचारणा केली. आणि त्यांना बालविण्यास सांगितले. ते दुसरे तिसरे कोणी नव्हते तर ते महात्मा फुले होते. फुलेंना बोलाविल्यानंतर त्यांनी त्या राजाला एक निवेदन दिले. त्याकाळी दुष्काळ पडला होता. दुष्काळाच्या काळात लोकांना खडी फोडण्याचे काम दिले जायचे. मी ही दुष्काळात खडी फोडण्याचे काम केल्याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगत उपस्थित पक्षाच्या नेत्यांसह प्रेक्षकांना एक आर्श्चयाचा धक्का दिला.

८१ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोजित सत्कार सोहळ्याला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी उपस्थित होते.

महात्मा फुलेंनी जे निवेदन दिले होते त्यात लिहिले होते की, दुष्काळात शेतकऱ्यांना आणि नागरीकांना खडी फोडण्याचे काम देण्यापेक्षा पावसाळ्यात जो काही थेंब न थेंब पडतो ते साठवणूकीसाठी त्यांना तळे उभारणीचे काम द्या जेणे करून पावसाचे पाणी अडविले जाईल आणि त्याचा वापर पुढे भविष्यकाळात होईल. तसेच शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांना पशुपालन हा एकमेव उद्योग आहे. त्या गायींपासून मिळणाऱ्या दुध उत्पादनातून त्यांना चार पैसे मिळतात. मात्र ज्या गायीपासून खोंड जन्माला येते त्याच खोंडाचा उपयोग त्याच गायीकडून पुन्हा पुढची पिढी निर्माण करण्यासाठी केला जातो. त्यामुळे पशुधनाची चांगली निर्मिती होत नाही. त्यामुळे त्यांना पशुधनातून चांगले उत्पन्न निर्माण होत नाही. त्यामुळे सरकारने ब्रिटनमधून चांगले बैल आणून येथील पशुधनाचे चांगली निर्मिती करण्यासाठी मदत करावी आणि त्यामुळे गायींकडून दुधाचे चांगले उत्पादन होईल आणि शेतकऱ्यांना नवे संकरीत पशुधन मिळेल. त्याचबरोबर शेतकरी हा एकाच बियाणाचा वापर करून त्यातून पुन्हा पुन्हा उत्पादन घेत असल्याने शेती उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे ब्रिटनमधून या बियाणांमध्ये संकरीत पध्दतीचा वापर करून ती बियाणे शेतकऱ्यांना द्यावीत जेणेकरून भारतातील शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पादन घेता घेईल असे त्या निवेदनाच्या माध्यमातून फुले यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या दूरदृष्टीने या मागण्या त्या राजाकडे केल्याचे शरद पवारांनी सांगितले.

१९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी देशात एक अंतरीम सरकार स्थापन करण्यात आले होते. त्या सरकारला ब्रिटीशांनी मान्यता दिली होती. त्या सरकारमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे कृषी आणि कामगार मंत्रालयाचा कारभार सोपविण्यात आला होता. त्यांची दूरदृष्टी खुप मोठी होती. त्यांनी त्या मंत्रालयाचा कारभार संभाळताना देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने दोन गोष्टी केल्या. हिमालयातून जे पाणी येते त्या पाण्याचा थेंब न थेंबाचा उपयोग करायच्या दृष्टीकोनातून त्यांनी भाकरा नांगल आणि दामोदर व्हॅली या दोन धरणांच्या निर्मितीचे काम हाती घेतले. आणि धरणाच्या पाण्यातून वीज निर्मितीचाही प्रकल्प हाती घेतला. त्या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ज्या ठिकाणी वीजेची निर्मिती होत नाही. त्या ठिकाणापर्यंत वीज ग्रीडच्या माध्यमातून वीज पोहोचविण्याचा निर्णय घेत तसे धोरण राबविले. त्याच्या दूरदृष्टीमुळेच देशाच्या विकासात योगदान मिळाल्याचे सांगत देशाला एकसंध ठेवण्यासाठी त्यांनी राज्यघटनेत ज्या तरतूदी केल्या त्यामुळेच आज देश एकसंध असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांचे नाव सगळेच घेतात, मात्र त्याचे विचार नेमके काय होते हे सांगत नाहीत. एकदा काही लोक राजर्षी शाहु महाराजांना भेटायला आले. त्या लोकांनी सांगितले की, कर्नाटकातून एक मोठा ज्योतिषी येत आहे. त्याला आपण भेटावे अशी विनंती केली. मात्र राजांनी सांगितले की मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. परंतु लोकांनी फारच आग्रह केल्यावर त्यांनी भेटायचे ठरविले. तो ज्योतिषी आल्यानंतर त्याला दोन दिवसांनी भेटायला बोलावले. ज्योतिषी आला तीन दिवसांनी आणि राजांसमोर रडायला लागला. राजांनी विचारले काय झालं रडायला त्यावर ज्योतिषीने सांगितले मला तुमच्या पोलिसांनी आल्या आल्या पकडले, मला तुरुंगात डांबले आणि मला मारहाण केली. त्यावर राजांनी विचारले, तु काय करतोस त्यावर ज्योतिष्याने उत्तर दिले, मी ज्योतिषी सांगतो. त्यावर शाहु महाराज म्हणाले, तुला तुझ्या ज्योतिष विद्येने सांगितले नाही का? की काय पुढे होणार आहे ते जर तुझे ज्योतिष्य भविष्य सांगत नसेल तर काय उपयोग. मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही मी आधुनिकतेवर विश्वास ठेवतो असे सांगत राजांनी त्या ज्योतिष्याला परत पाठविले. हा विचार आणि दूरदृष्टी घेवून चालण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी सांगितले.

देशातील या गरीब, वंचित समाजव्यवस्थेच्या बाहेर राहणाऱ्या लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी ही पक्ष संघटना बांधली. ही संघटना बांधत असताना केवळ समाजकारण हाच हेतू डोक्यात होता. त्यामुळे एखाद्या गरीब, वंचित आणि त्या गावकुसाबाहेरच्या व्यक्तीच्या हाल-अपेष्टा एकून आणि पाहून जो चिंताग्रस्त होईल, जो दु:खी होईल तोच खरा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल अशी नवी व्याख्याही त्यांनी यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितली.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समाजकारणावर भर द्यावा लोकांची दु:खे जाणून घेवून त्या पध्दतीने कामे करावीत तरच तुम्ही लोकांशी आपोआप जोडले जाल असा सल्ला त्यांनी आवर्जून देत एकप्रकारे भविष्यातील पक्षाच्या वाटचालीसंदर्भात राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांना रोडमॅप दिला.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *