Breaking News

शरद पवार यांचा सुनिल शेळके यांना सज्जड दम, …मला शरद पवार म्हणतात

एकदा दमदाटी केली तेवढं बास…पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला…तुम्ही त्याची काळजी करू नका…मी या रस्त्याने कधी जात नाही…पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर, सोडतही नाही! असा सज्जड दम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे समर्थक मावळचे आमदार सुनिल शेळके यांना दिला.

लोणावळा येथे नियोजित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या पक्षाच्या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना लोणावळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यक्रमाला जाऊ नये असे अशी दमबाजी केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओतील काही कार्यकर्त्यांनी थेट शरद पवार यांच्याकडे तक्रार करत त्यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यावरून शरद पवार यांनी अजित पवार गटाला आणि समर्थक आमदार सुनिल शेळके यांना सज्जड दम दिला.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आठवड्यातून एकदा या रस्त्याने येथून जात असतो. पण, कधी या ठिकाणी थांबलो नाही. गेल्या अनेक वर्षांचा संबंध या तालुक्याशी माझा स्वतःचा आहे. कालच देशाचे गृहमंत्री आपल्या राज्यात आले होते आणि त्यांच्या मुंबईच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की, ५० वर्ष महाराष्ट्रावर शरद पवार बसले. मी त्यांचा आभारी आहे. ५० वर्ष लोकांनी त्या ठिकाणी मला निवडून दिले हे त्यांनी मान्य केले. आज यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या विधिमंडळात जाऊन पहिल्यांदा आमदारांना निवडून देऊन, नंतर खासदार, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यसभा; हा सर्व काळ जर पाहिला, तर तो ५६ वर्ष आहे आणि आज देशाच्या पार्लमेंटमध्ये एक माणूस सतत ५६ वर्ष कुठे ना कुठेतरी लोकांच्या कामात आहे असे चित्र नाही. आणि ते चित्र माझ्यामध्ये तुम्ही लोकांनी तयार केले. तुम्हा लोकांची साथ होती असेही सांगितले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, आज आपण जवळून बघतो. देशाचे पंतप्रधान प्रत्येक दिवशी एक जरी वृत्त पेपर पाहिला, तर त्याचं पूर्ण पान त्यांचीच जाहिरात आहे की नाही ? रोज जाहिरात आहे. आणि त्या जाहिरातींमध्ये मोदींचा गुणगान आणि आणखीन काय काय; शेवटी ही जाहिरात कुठून आणि कुणाच्या खर्चाने, कुणाच्या पैशाने दिली जाते याचा विचार केला तर, या देशातल्या जनतेच्या पैशाने आपली प्रसिद्धी ही त्या ठिकाणी केली जाते. आणि हे गृहस्थ देशाच्या जनतेला आज गॅरंटी द्यायला निघालेले आहेत. कसली गॅरंटी ? असा सवालही यावेळी उपस्थित केला.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आज या देशामध्ये शेतीचे उत्पादन वाढवायचे. माझ्याकडे दहा वर्ष देशाच्या शेतीचे काम होते आणि मला आठवतंय, ज्या दिवशी मी मंत्रिमंडळाची शपथ घेतली. त्यानंतर घरी आलो आणि पहिली फाईल माझ्याकडे आली की, अमेरिकेतून गहू आयात करायचे आहेत. मी सही केली नाही. मी अस्वस्थ झालो. हा कृषीप्रधान देश म्हणायचा, शेतकऱ्यांचा देश म्हणायचा. आणि आमच्या देशातल्या जनतेला गहू आणि तांदूळ हे परदेशातून आणायचे? हे चित्र बदलले पाहिजे, असा निर्धार केला. डॉ. मनमोहन सिंग यांनी आम्हा लोकांना साथ दिली आणि ज्या दिवशी मी १० वर्षांनी कृषी खात्याचे मंत्रीपद सोडले, त्यादिवशी हिंदुस्थानच्या शेतकऱ्यांच्या घामाला आणि कष्टाला योग्य ती प्रतिमा देऊन हा देश जगातला २ नंबरचा गहू तयार करणारा देश झाला. हा देश जगातला १ नंबरचा तांदूळ तयार करणारा देश झाला. हा देश जगात २ नंबर साखर उत्पादन करणारा देश झाला. हे सर्व घडू शकले आणि आज हे सांगतात की, आम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करत आहोत. आता १० वर्ष होतील मोदींना सत्तेवर येऊन, पण कधी उत्पन्न दुप्पट वाढले का ? एकच गोष्ट वाढली ती म्हणजे, ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या’ अशी खोचक टीकाही यावेळी केली.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, कष्ट करणारा, काळ्या आईची सेवा करणारा शेतकरी, त्याला त्याच्या मालाची योग्य किंमत मिळत नाही. डोक्यावरचे कर्जाचे ओझे फिटत नाही. घरातल्या थकबाकीमुळे, कर्जबाजारी झाल्यामुळे घरच्या सामानाचा लिलाव निघतो आणि त्यामधून सुटका व्हावी याआधी शेवटी तो शेतकरी बळीराजा आत्महत्येच्या रस्त्यावर जातो. ही शेतकऱ्यांना गॅरंटी दिली. आज बळीराजाला आत्महत्या करण्याचे दिवस मोदींच्या कालखंडामध्ये आले, ही गोष्ट या देशाला शोभणारी नाहीये असा उपरोधिक टोलाही यावेळी नरेंद्र मोदी यांना लगावला.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, गेल्यावर्षी दिल्लीमध्ये पंजाब, हरियाणा इथल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले. दिल्लीच्या दारात, दिल्लीच्या प्रवेशद्वारामध्ये काही हजार शेतकरी येऊन बसले. किती दिवस बसले ? एक वर्ष; दिल्लीची थंडी, दिल्लीचा उन्हाळा त्यांनी सोसला. आमच्या प्रश्नांची सोडवणूक झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही, ही भूमिका त्यांनी घेतली. या देशाचा शेतकरी, देशाच्या राजधानीवर एक वर्ष हजारोंच्या संख्येने लढत असतो. आणि शेवटी काही थातूर-मातूर घोषणा सरकारने केली आणि त्यांनी आपले आंदोलन थांबवले. आज तो शेतकरी पुन्हा आंदोलन करण्यासाठी त्या ठिकाणी रस्त्यावर आहे आणि म्हणून बळीराजाला आज हे दिवस पहावे लागले. त्यांना सत्तेवर बसायचा अधिकार नाही, हे सांगायची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे, असेही सांगितले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधानांनी सांगितलं, आमच्या हातामध्ये सत्ता द्या. आम्ही देशाची बेकारी घालवतो. आज या देशामध्ये तरुण मुलांना नोकरी नाही. कोट्यावधी बेकारी घालवण्यासंबंधीचा तुमचा शब्द, तुमचे आश्वासन हे गेले कुठे ? मोठ-मोठी आश्वासने द्यायची. टीकाटिप्पणी करायची. याशिवाय दुसरे काही काम या राज्यकर्त्यांनी केले नाही. एक साधी पद्धत आहे की, देशाचा प्रधानमंत्री असतो किंवा कोणी मंत्री असतो, तो जर एखाद्या राज्यात गेला आणि ते राज्य जर त्यांच्या विचारांचे नसले तरीही केंद्राचं मंत्रिमंडळ त्या राज्याच्या प्रश्नाची सोडवणूक करणे आणि त्या राज्याच्या निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान करणे हे केंद्राच्या मंत्र्यांचे आणि पंतप्रधानांचे काम असते याची आठवणही यावेळी करून दिली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आज आपण नरेंद्र मोदींचे भाषण बघतो. काल ते बंगालमध्ये होते. बंगालमध्ये भाषणाला सुरुवात केली ती ममता बॅनर्जीवरून; ममता बॅनर्जी कोण ? तिथे १० वर्ष मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेल्या एक भगिनी. अतिशय साधी राहणारी. ममता आणि मी एकत्र काम केले. आम्ही दोघेही केंद्रीय मंत्रिमंडळात एकत्र होतो. त्यांच्या घरी देखील मी कलकत्त्याला गेलेलो आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, गेले २५ वर्ष पार्लमेंटमध्ये, ५ वर्ष केंद्रामध्ये मंत्री, १० वर्ष मुख्यमंत्री. त्यांचे घर केवढे आहे माहिती आहे का ? १० बाय १० ची खोली; १० बाय १० च्या खोलीत राहणारी एक भगिनी आज त्या राज्याचे नेतृत्व करते. लोक सन्मानाने तिला ३-३, ४-४ वेळेला निवडून देतात. तिच्या हातामध्ये राज्य देतात. देशाच्या पंतप्रधानांना अभिमान वाटला पाहिजे की, आमच्या देशातली एक भगिनी एक मोठे राज्य समर्थपणाने चालवते. पण, तिथे जाऊन त्यांच्यावर टीकाटिप्पणी करणे, हे लोकशाहीला विशेषतः संसदीय लोकशाहीच्या चौकटीमध्ये बसत नाही. हे काम त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहे. अनेक गोष्टी सांगता येतील असा सूचक इशाराही यावेळी दिला.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, आज भ्रष्टाचार हा देशाचा सर्वोच्च विषय आहे आणि नरेंद्र मोदी त्यावर बोलतात की, आमच्यावर त्यांनी टीका केली. महाराष्ट्रामध्ये ते एकदा आले. दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये एक पुस्तक त्यांनी तयार केले आणि आम्हा सर्वांना दिले. त्या पुस्तकात होते काय ? पुस्तकात हे होते की, भाजपाची सत्ता नव्हती त्यावेळेला म्हणजे, आमची सत्ता होती. त्या काळात किती चुकीच्या गोष्टी या झाल्या ? आणि त्यातील पहिली गोष्ट अशी होती की, महाराष्ट्रामध्ये मुंबईला जवानांसाठी एक हाउसिंग सोसायटी काढली. तिचे नाव, आदर्श सोसायटी आणि त्या आदर्श हाऊसिंग सोसायटीमध्ये काँग्रेसचे त्या वेळेचे माजी मुख्यमंत्री त्यांचे हात आहेत. त्यांनी जवळच्या नातेवाईकांना तिथे जागा दिल्या आणि सत्तेचा गैरवापर झाला ते नाव कोणाचे होते ? त्यांचे नाव, अशोक चव्हाण. हा आरोप कुणावर होता तर अशोक चव्हाणांवर होता आणि अशोक चव्हाणांच्या या आरोपावर सातव्या दिवशी अशोक चव्हाण भाजपामध्ये गेले. राजीनामा दिला. १५ व्या दिवशी त्यांना खासदार केले, म्हणजे तुम्ही एका बाजूने आरोप करता आणि दुसऱ्या बाजूने स्वतःच्या पक्षात घेतात अशी टीकाही भाजपावर केली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, भोपाळला पंतप्रधानांनी १ वर्षापूर्वी भाषण केले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिथे खूप भ्रष्ट लोक आहेत. आणि त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्रामध्ये पाटबंधारे खात्यामध्ये ७० हजार कोटींचा घोटाळा हा झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये सहकारी बँकेमध्ये घोटाळा झाला. हा आरोप त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केला. मी जाहीर पणाने सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असा घोटाळा कोणी केलाच नाही. कुणी केला असेल, तर तुमच्यात हिम्मत आहे तर तुम्ही चौकशी करा. सुप्रीम कोर्टाचा माणूस नेमा. पोलीस खात्याचा माणूस नेमा. आणि त्या मार्फत ही चौकशी होऊ द्या. एकदा समजू द्या, ‘दूध का दूध और पानी का पानी’. पण, आता त्यावर ते बोलत नाही. ज्यांच्यावर आरोप केले हे घटक आज कुठे आहे ? याची पाहणी तुम्ही केली पाहिजे. याचा अर्थ असा आहे की, आज भाजपामध्ये एक वॉशिंग मशीन झालेले आहे. वॉशिंग मशीन; कपडे खराब झाले असतील तर मशीन मध्ये टाका, मग बाहेरून स्वच्छ होतील आणि ज्यांच्यावर आरोप झालेले असतील. भ्रष्टाचार केला असेल तर, भाजपात या आणि स्वच्छ होऊन बसा. आणि त्यांच्या विचारांनी काम करा. आज या पद्धतीचे राजकारण केले जात आहे आणि सत्तेचा एका बाजूने गैरवापर, विरोधकांवर टीका आणि त्या पद्धतीने देश मी चालवणार हे चित्र घेऊन भाजपा आणि विशेषतः मोदी आणि त्यांचे सहकारी देशात काम करत आहेत अशी टीका केली.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, अनेक गोष्टी सांगता येतील. सत्तेचा गैरवापर तर इतका; झारखंड नावाचे एक राज्य आहे. तिथे आदिवासी लोक राहतात. तिथे आदिवासी मुख्यमंत्री होते. त्यावर यांनी आरोप केले आणि आज त्यांना तुरुंगात टाकले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. आज दिल्लीमध्ये गेले १० वर्ष अरविंद केजरीवाल नावाचे मुख्यमंत्री आहेत. मी पार्लमेंटचा सदस्य म्हणून दिल्लीमध्ये राहतो. दिल्लीमध्ये प्राथमिक शिक्षण असो, आरोग्याच्या सुविधा असो अशा अनेक गोष्टी आहेत की, कोणत्याही राज्यापेक्षा अधिक चांगले काम आज दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असलेल्या सरकारने त्या ठिकाणी केलेले आहे. आणि म्हणून चांगले काम केले, जगातले लोक दिल्लीमध्ये येतात आणि या कामाची पाहणी करतात त्यांचे कौतुक करण्याऐवजी त्यावर नोटीसा पाठवल्यात. आजच पेपरला छापून आलंय की, आठवी नोटीस त्यांना पाठवली आहे आणि मला शंका अशी आहे की, ती नोटीस-समन्स हे त्यांनी घेतल्यानंतर त्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकायचे. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना टाकले, आता दिल्लीचा नंबर येईल असेही सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुख नावाचे नागपूरचे राज्याचे गृहमंत्री होते. त्यांच्यावर आरोप केला की, यांनी १०० कोटी पैसे एका शिक्षण संस्थेला घेतले. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना त्या ठिकाणी अटक केली. ६ महिने तुरुंगात ठेवले आणि शेवटी कोर्टामध्ये त्यांना सोडण्यात आले. आणि सोडल्यानंतर १०० कोटी वगैरे हे तथ्यच नाही. १ कोटी रुपयांची देणगी कॉलेजची इमारत बांधण्यासाठी चेकने घेतली, हा विषय त्या ठिकाणी निघाला. आज बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. मराठी माणसाच्या प्रश्नांची मांडणी ते सामना वृत्तपत्रातून करतात. सामनाचे संपादक संजय राऊत हे खासदार आहेत. माझ्या शेजारीच पार्लमेंट मध्ये त्यांची जागा आहे. आणि सामना मधून नरेंद्र मोदींच्या सरकारवर ते टीका टिप्पणी करतात. त्यांनी टीका केली म्हणून त्यांना ४ महिने तुरुंगात टाकले. लोकशाहीमध्ये लिखाणाचे स्वातंत्र्य आहे की नाही ?

शेवटी बोलताना शरद पवार म्हणाले की, माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, आम्हा सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्र विकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी तुमची शक्ती उभी करणे ही जबाबदारी तुम्हा सगळ्यांची आहे. आत्ताच बाफना सर सांगत होते इथल्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या मिटींगला तुम्ही येऊ नये यासाठी काही दमदाटी केली. आणखीन कोणावर टीका केली. आणि म्हणून त्यांना फोन करण्यात आला. ही मोठी गंमतीची गोष्ट आहे. लोकशाहीमध्ये एखाद्या नेत्याची गोष्ट चुकली, तर टीका करायची नाही, जाहिर बोलायचे नाही आणि तसे बोलले तर दमदाटी इथल्या आमदारांनी केली. मला त्यांना सांगायचे आहे, ‘बाबा रे तू आमदार कोणामुळे झाला ? तुझ्या सभेला इथे कोण आले होते ? त्या वेळेचा तुझा पक्षाचा अध्यक्ष कोण होता ? फॉर्म भरायला चिन्ह आणि नेत्याची सही लागते ती माझी होती. आणि माझ्या सहीने तू निवडणूक लढलास. आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या, त्याच विचारांच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्यासाठी राबले, घाम गाळला, आज त्यांना तुम्ही दमदाटी करतात.’ माझी विनंती आहे, एकदा दमदाटी दिली तर बस्स, पुन्हा जर असं काही केले तर, ‘शरद पवार म्हणतात मला.’ असा सूचक इशारा देत तुम्ही त्याची काळजी करू नका. मी या रस्त्याने कधी जात नाही. पण, त्या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर सोडतही नाही, असा इशाराही दिला.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *