Breaking News

शरद पवारांनी राहुल गांधीला इंजेक्शन दिलेय देशाची जनता चार पिढ्यांच्या कारभाराचा हिशोब मागत असल्याचे राहुल गांधीना शाहचे उत्तर

मुंबई : प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी अर्थात राहुल बाबा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागील चार वर्षातील हिशोब मागत आहेत. मात्र त्यांच्या पूर्वीच्या चार पिढ्यांनी केलेला राज्य कारभाराचा हिशोब देशातील जनता मागत असल्याचे सांगत राहुल बाबा शरद पवार यांना भेटले असून त्यांनी इंजेक्शन दिल्यानेच ते हिशोब मागत असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली.

भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त वांद्रे येथील बीकेसी संकुलात आयोजित महामेळाव्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील भाजपचे सर्व मंत्री यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

मात्र राहुल बाबा आणि शरद पवार यांनी कान उघडे ठेवून ऐकावे की, देशातून मागासवर्गीय लोकांना दिलेले आरक्षण हटविणार नाही. आणि तुम्हीही हटविणार असाल तर ते आम्ही होवू देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील जनतेच्या विकासाचे काम हाती घेतले आहे. ते काम तसेच पुढे नेणार असून २०१९ ची निवडणूक पुन्हा आम्हीच जिंकू असा विश्वास व्यक्त करत आगामी काळात पंजाब, प.बंगाल, ओरीसा राज्यातही भाजप स्वबळावर सत्ता आणणार असल्याची घोषणा करत कर्नाटकचा उल्लेख करण्याचे त्यांनी यावेळी टाळले.

देशाच्या विविध प्रश्नावर आम्ही संसदेत चर्चा करायला तयार होतो. मात्र विरोधकांनी गोंधळ घालत सभागृहाचे कामकाजच चालू दिले नाही. आता विरोधक सरकार चर्चा करायला तयार नसल्याचा आरोप बाहेर करत आहेत. मात्र देशाच्या कोणत्याही भागात आम्ही चर्चा करायला तयार असल्याचे सांगत तुम्ही चर्चेचे ठिकाण निवडा आम्ही चर्चेला यायला तयार असल्याचेही त्यांनी यावेळी विरोधकांना आव्हान दिले.

२०१९ चे काऊंटडाऊन सुरु आहे. मात्र देशातील सर्व विरोधक एकमेकांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत. जसे एखाद्या नदीला पुर आल्यावर कुत्री, मांजरी, वाघ, सिंह हे झाडावर चढून बसतात आणि स्वत:चे प्राण वाचवितात. तसेच देशातील विरोधकांची अ‌वस्था झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर आल्याने स्वत:चा जीव वाचविण्यासाठी विरोधक एकत्र येत असल्याचा राजकिय टोलाही त्यांनी यावेळी केला.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *