Breaking News

राज्यातील मविआ सरकार म्हणजे दाऊदचे समर्थक आणि शेतकऱ्यांचे विरोधक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री थेट अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्याशी व्यवहार करतो आणि त्याला वाचविण्यासाठी संपूर्ण राज्य सरकार उभे राहते. असे कधी घडले नसल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत एकाबाजूला दाऊदशी व्यवहार करणाऱ्यास वाचविताना दुसऱ्याबाजूला राज्यातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याचे काम या सरकारकडून सुरु असून दाऊदचे समर्थन करणारे शेतकरी विरोधी सरकार सध्या राज्यात असल्याची टीका त्यांनी केली.
तसेच हे सरकार भष्ट्राचारी लोकांचे सरकार असल्याने अशा सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याची घोषणाही त्यांनी सांगितले.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन बुधवारी ३ मार्चपासून सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी फडणवीस यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, अॅड. आशिष शेलार यांच्यासह अनेकजण भाजपा नेते उपस्थित होते.
दाऊद इब्राहिम, अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे आहे. देशात असे कधी घडले नाही. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत, ते मुंबईच्या खून्यांशी व्यवहार करणाऱ्या सोबत राहतात, हेही पाहतो आहोत. उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक होणारच असा निर्धार व्यक्त करत पण आम्हाला चर्चेत रस असून अधिवेशनात अनेक मुद्दे मांडणार आणि चर्चा सुद्धा करणार असे त्यांनी सांगितले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला हल्ली सरकारमध्ये कोणी मान देत नाही. त्यांनी यापूर्वी एकदा एक सांगितले, नंतर पुन्हा वेगळेच सांगितले. आता ते म्हणतात यावेळी शेतकऱ्यांची वीज कापली जाणार नाही. परंतु ऊर्जामंत्री नितीन राऊत वेगळेच बोलत असल्याची बाब त्यांनी यावेळी निदर्शनास आणून देत शेतकरी हवालदिल झाला आहे, आता उन्हाळा सुरु झालेला असताना शेतकऱ्याची वीज तोडली जात आहे आणि शेतकऱ्यांना आपली उभी पिके जळताना पहावे लागत असून शेतकरी विरोधी राज्य सरकारची असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
अजित पवार यांनी दोन वेळा वीज न कापण्याबाबत शब्द दिला, पण त्यांचे कुणी ऐकत नाही. त्यांच्या शब्दाला मान राहीला नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून कोणतीही मदत अद्याप दिली नसून ऊस गाळपासाठी जाणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे मागील आस्मानी संकटानंतर आता वीज कनेक्शन तोडणीमुळे राज्यात शेतकऱ्यांवर सुलतानी संकट आल्याची टीका करत कर्जमाफीतील अपूर्ण बाबी अधिवेशनात द्यायला लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विविध समाजांचे प्रश्न आहेत. मराठी समाजाच्या प्रश्नावर छत्रपतींना उपोषणाला बसायला बाध्य व्हावे लागले. आणि पुन्हा तीच आश्वासने सरकारने दिल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचार चरमसीमेला पोहोचला असून लिपिक साहेबांना लाच मागतो तर कंत्राटदारांकडून बचावासाठी काही अधिकारी बंदुकांची मागणी करतात, अशी भयावह स्थिती राज्यात असल्याचे सांगत याचा जाब सरकारला विचारू असा इशाराही त्यांनी दिला.
देशद्रोह्यांशी संबंध हा सर्वात मोठा गुन्हा आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा बचाव करताना नाही जनाची तर किमान मनाची तरी लाज बाळगा असा टोला लगावत तुमच्यासारख्या अहंकाऱ्यांना महाराष्ट्र झुकवून दाखवेल. तुम्ही म्हणजे मराठी किंवा महाराष्ट्र नाही. महाराष्ट्राची बारा कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे आणि ती तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी देत नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसतील, तर मग हेच म्हणावे लागेल की हे दाऊद इब्राहिमला समर्पित सरकार आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Check Also

राज ठाकरे-अमित शाह भेट होणार का? फडणवीस यांनी दिले ‘हे’ संकेत आयत्या वेळी होवू शकते भेट

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published.