Breaking News

अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर सत्यजीत तांबे म्हणाले, मी भेटलो आणि त्यांना… माझी प्रामाणिक इच्छा होती की महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून..

नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्यजीत तांबे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीने मदत केल्याचा गौप्यस्फोट केला. त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांना खुलासा करावा लागला तर काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यातच आज निवडणूकीतील विजयानंतर अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत घेत भूमिका स्पष्ट केली. तसेच अजित पवारांच्या वक्तव्याबाबतही खुलासा केला.

यावेळी सत्यजीत तांबे म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट झाली. त्यांना मी विनंती केली, मी जरी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला असला तरी मी महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा. तसेच यासंदर्भात घोषणाही करावी. त्यावर अजित पवार यांनी ठिक आहे एवढेच उत्तर दिल्याचे स्पष्ट केले. तसेच यावेळी दोन नेत्यांपाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख करून घटनाक्रम सांगितला. तसेच आपण शरद पवारांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण ते मला भेटले नाही, असंही नमूद केलं.

सत्यजीत तांबे म्हणाले, १२ जानेवारीला दुपारी साडेतीन वाजता मी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर मला पहिला फोन प्रभारी एच. के. पाटील यांचा आला. त्यांनी मला विचारलं की काय अडचण आली सत्यजीत. मी त्यांना सर्व प्रश्न सांगितला आणि मी अपक्ष उमेदवारी भरल्याचं सांगितलं. तसेच आपण मला पाठिंबा जाहीर करून टाकावा, अशी मागणी केली. ते म्हणाले ठीक आहे.

सत्यजीत तांबे पुढे म्हणाले, माझी प्रामाणिक इच्छा होती की, मला महाविकास आघाडीने तातडीने पाठिंबा द्यावा. आम्ही दिल्लीशी संपर्कात होतो. मला दिल्लीतून सांगण्यात आलं की, तुम्ही एक पत्र लिहा आणि काँग्रेसचा पाठिंबा मागा. मी पत्र लिहिलं आणि पाठवलं. त्यांनी पत्रात हा शब्द समाविष्ट करा, तो समाविष्ट करा सांगितलं. आमचा पूर्ण एक दिवस ते पत्र अंतिम करण्यात गेला.

दिल्लीतील नेते मला म्हणाले की, तुला जाहीर माफी मागावी लागेल. मी म्हटलं, माझी काहीच चूक झालेली नाही. ते म्हटले, तरीही माफी मागावी लागेल. मी जाहीर माफी मागायलाही तयार झालो. मी म्हटलं, मी जाहीर माफीही मागेन, काही हरकत नाही. कारण ज्या पक्षात मी आयुष्यभर काम केलं त्या पक्षाला सोडून भूमिका घेणं मला योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे मी माफी मागायलाही तयार झालो, असंही सत्यजीत तांबेंनी नमूद केलं.

Check Also

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *