Breaking News

अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी गप्प बसणार नाही राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची घेतली भेट...

जोपर्यंत अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला.

अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करावे यासाठी आज राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन मागणी केली.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, मंत्री अब्दुल सत्तार यांनी आमच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून पुन्हा एकदा खालचा स्तर दाखवला आहे. मंत्रिमंडळात असणार्‍या अशा जबाबदार मंत्र्याने अशी भाषा वापरणे आणि भारतातील संसदेत काम करणाऱ्या एका महिला खासदाराबाबत अशाप्रकारे बोलणे कितपत योग्य आहे. सत्तार यांच्या या वक्तव्याचा सर्व स्तरावर निषेध होत आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.

अब्दुल सत्तार यांची ही भाषा पहिलीच नाही. यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी यांना दारु पिता का असा प्रश्न विचारला होता. आता एखाद्या महिलेबाबत बोलणे, त्या संसदेत अतिशय पोटतिडकीने बोलतात त्यांच्याबाबत बोलणे ही तर हद्दच झाली आहे. मंत्र्यांनी काही मर्यादा सांभाळायच्या असतात, परंतु या मर्यादांचा वारंवार हे मंत्री उल्लंघन करत आहेत. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपाल हे सर्वोच्च आहेत. सरकार ऐकत नसेल तर त्यांना आम्ही कैफियत मांडू शकतो. हा विषय माफी मागून संपणार नाही. हवे ते विधान करता मग माफी मागता हे महाराष्ट्रात चालणार नाही. सरकारमधील लोकांनी विचार करावा, त्यांना आपले सहकारी कसे हवेत. अब्दुल सत्तार यांच्यावर साधा गुन्हा दाखल केला जात नाही. मंत्री आहेत म्हणून पोलिस घाबरत असतील तर पोलिसांनी आपल्या कर्तव्यापासून चुकू नये, सरकारे येतात आणि सरकारे जात असतात असेही ते म्हणाले.

या सरकारमधील मंत्र्यांची महिलांविषयी काय भूमिका आहे, महिलांचा द्वेष कशापद्धतीने करतात, यांचा महिलाविषयी काय विचार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. सरकारमधील मंत्री कसे असावेत याचा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा आणि मंत्र्याने जे वक्तव्य केले आहे ते देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे का? असा सवाल करतानाच मंत्र्यांची ही भूमिका भाजपाला मान्य असेल तर बडतर्फ करणार नाही आणि मान्य नसेल तर धाडसाने सरकार येत जात असतात त्यामुळे कुणाकुणाला पदरात घ्यायचे व कुणाची ओझी उचलायची हे एकदा भाजपाने ठरवले पाहिजे असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी शिष्टमंडळात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, अल्पसंख्याक मुंबई अध्यक्ष सोहेल सुभेदार, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींचा समावेश होता.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *