Breaking News

नरेंद्र मोदी जुन्याच आश्वासनांवर निवडणूक लढवतायत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची टीका

पुणे – तळेगाव दाभाडेः प्रतिनिधी
गेली ५ वर्षे नरेंद्र मोदींचं राज्य आपण बघितलं, मोदींनी सांगितले होते उद्योगधंदा वाढवेन… रोजगार देईन…अनेक आश्वासन त्यांनी दिली. लोकांनी याच आधारावर भाजपला बहुमत दिले. बहुमत असेल तर कोणतेही निर्णय घेता येतात. त्यामुळे मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होईल असे वाटले होते. परंतु ही निवडणुकही भाजपला त्याच आश्वासनांच्या जोरावर लढवावी लागत असल्याची टिका शरद पवार यांनी केली.
निवडणूका ही एक लोकशिक्षणाची उत्तम संधी…प्रशासन कसे काम करते हे सांगण्याची संधी… आणि जिथे कमतरता असेल तिथे पुढच्या पाच वर्षांत खबरदारी घेण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून येते आणि तीच अपेक्षा आम्हाला मोदींकडून होती. परंतु त्यांची फक्त भाषणेच झाली असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
मावळचे महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची तळेगाव- दाभाडे येथे जाहीर सभा आज पार पडली.
पुर्वीचे मुख्यमंत्री निवडणूका आल्या की, पाच वर्षांत आम्ही काय केले आणि पुढील पाच वर्षांत काय करणार आहोत हे निवडणूकीत सांगत होते परंतु सध्या काय सुरु आहे असा सवालही त्यांनी केला.
नाशिकमध्ये दोन- तीन दिवसापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. मी अनेक मोठ्या सभा पाहिल्या आहेत, हजर राहिलो आहे. पुण्यात कॉलेजला असताना पंडीत जवाहरलाल नेहरू यांची सभा पाहिली. इंदिरा गांधी यांच्या रेसकोर्सवरील सभा पाहिल्या आहेत. यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या सभा पाहिल्या. राजीव गांधी यांच्या सभा पाहिल्या. परंतु या नाशिकच्या मोदींच्या सभेत मैदानाच्या बाहेरुन खड्डे पाडण्यात आले होते आणि एकच रस्ता ठेवण्यात आला होता. यावेळी पोलिसांना विचारलं तर लोकांनी मैदानाबाहेर जावू नये म्हणून असं करण्यात आल्याचं सांगितले. मला या गोष्टीची फार मोठी गंमत वाटली असेही ते म्हणाले.
काँग्रेसच्या काळात विकासाला महत्व दिलं जात होतं भाषणांना नाही असा टोला शरद पवार यांनी मोदींना लगावला.
शेती आणि उद्योगाच्या माध्यमातून विकास व्हायला हवा हे धोरण काँग्रेसचे होते. पाच वर्षांपूर्वी मोदी शेतकऱ्यांचे जीवन बदलणार होते झालं का ?असा सवालही त्यांनी केला.
यशवंतराव चव्हाण यांनी अतिशय कमी वयात माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकल्या. अशीच पुढची जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही तरुणांना तिकीटं दिली आहेत. पार्थ यांना तिकीट देण्याचे कारण हेच आहे. तरुण नेतृत्वाची फळी या लोकसभेत उतरवली आहे. त्यापैकीच पार्थ पवार एक आहेत. हे नवखं नेतृत्व भविष्यासाठी आपल्या डोळ्यादेखत उभं करायला हवं. एखादवेळी या तरुणांना ठेच लागेल परंतु यातूनच ते शिकतील. त्यानंतर येणाऱ्या अनुभवातूनच ते कामे करतील. मावळच्या मतदारांनी बदल घडवायचं ठरवलं आहे, हे माझ्या कानावर आलंय. पार्थ पवार निवडून येतील याचा मला विश्वास असल्याचे ते म्हणाले.

Check Also

अरविंदरसिंग लवली अखेर भाजपामध्ये दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी आप AAP सोबतच्या युतीमुळे अलीकडेच दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे अरविंदर सिंग लवली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *