Breaking News

एसटी बस चालक-वाहकांसाठी खुषखबरः रात्रीच्या वस्ती भत्त्यात वाढ होणार बस स्थानकांवरील विश्रांतीगृहांसह स्वच्छतागृहांची- सुधारणासह स्वच्छता करणार-मंत्री दादाजी भुसे यांची ग्वाही

महाराष्ट्र राज्य परिवहन (एस. टी) महामंडळाच्या राज्यातील विविध बसस्थानकांवर बस चालक आणि वाहकांसाठी असलेल्या विश्रांतीगृहांमध्ये स्वच्छता आणि सुधारणा करण्याबाबत तातडीने संबंधितांना सूचना देण्यात येतील, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. विधान परिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री भुसे म्हणाले की, एस. टी.च्या वाहक आणि चालकांना रात्री बस मुक्कामी गेल्यानंतर तेथे विश्रांतीसाठी असणारी सुविधा अतिशय अपुरी आहे, ही वस्तुस्थिती आहे. यासंदर्भात सर्व संबंधितांना सूचना देण्यात येतील आणि तातडीने तिथे सुधारणा करण्यात येईल.

सध्याच्या परिस्थितीत वाहक आणि चालकांना मिळणाऱ्या रात्रीच्या वस्ती भत्त्यात सन २०१८ मध्ये वाढ करण्यात आली आहे. गावपातळीवर ७५ रुपये, जिल्हा पातळीवर ९० रुपये आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरात रात्रीचा वस्ती भत्ता १०० रुपये इतका देण्यात येत आहे. अधिकृत संघटना आणि व्यवस्थापन यांच्यात चर्चा करून त्यात जसे ठरेल त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सध्या एस. टी.च्या वतीने ७५ वर्षे ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत, महिलांना बस तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बसस्थानकांचे नूतनीकरण करताना त्याठिकाणी चालक आणि वाहक यांना निवासाची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे मंत्री भुसे यांनी सांगितले.

विविध विभागांकडून एस. टी.ला विविध सवलतीपोटी देण्यात येणारी रक्कम वेळेत मिळण्या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

या चर्चेत सदस्य सर्वश्री विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, भाई जगताप, शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर, सतेज पाटील यांच्यासह मनीषा कायंदे, उमा खापरे यांनी सहभाग घेतला.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *