Breaking News

२०१९ च्या निवडणूकासाठीच विनोद तावडे यांच्याकडून नाट्यसंमेलनाचा राजकिय वापर नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर यांचा आरोप : संमेलनाआधीच “वस्त्रहरणास” सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी

उद्या बुधवारी अखिल भारतीय नाट्यसंमेलनास सुरुवात होत असतानाच मागील चार वर्षांपासून एकाही नाट्य समेंलनाला उपस्थित न राहणारे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे हे यावर्षी मुद्दाम हजर रहात आहेत. तसेच आगामी निवडणूकाच्या निमित्ताने जनसंपर्क अभियान मोहीमेचा भाग म्हणून ते हजर रहात असल्याचा आरोप नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर यांनी केला आहे. हा राजकारणाचा भाग असल्याने मी संमेलनाला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यासंदर्भात त्यांनी एक पत्रकही जाहीर केले आहे. त्यामुळे नाट्य संमेलनाच्या आधीच सांस्कृतिक मंत्री आणि नाट्य निर्माते यांच्यात वस्त्रहरणास सुरूवात झाली.

यंदाचे नाट्यसंमेलन मुंबईतील मुलुंड येथे उद्या बुधवारी होत आहे. या नाट्यसंमेलनाच्या तयारीसाठी विविधस्तरावर गटसमित्यांची स्थापना करण्यात येतात. मात्र या नाट्यसंमेलनासाठी कोणतीही समिती स्थापन करण्यात आली नाही. या नाट्यसंमेलनच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्यावर सोपविण्यात आल्याने अनेक नाट्य कलावंत आणि नाट्य निर्मात्यांमध्ये नाराजी आहे. त्यातच आगामी २०१९च्या निवडणूका नजरेसमोर ठेवूनच या नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात येत असून हे निवडणूकीसाठीचे राजकारण नाही तर काय आहे? असा सवाल ही नार्वेकर यांनी आपल्या पत्रकाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यमंत्री तावडे यांना केला.

याचबरोबर मंत्री तावडे हे नाट्य संमेलनाचे आमंत्रण देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे स्वत: गेले. पण त्यांनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे मातोश्रीवर गेले नाहीत. यावरून हे राजकारण नाही तर काय आहे? असा सवाल करत मंत्र्यांच्या कारकिर्दीत व्यावसायिक नाटकांची २६ महिन्यात स्पर्धा झाली. त्यामुळे अभिनेते जितेंद्र जोशी, लता नार्वेकर यांच्यासह अनेकांचे नुकसान झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळा केला. निवडणूकांसाठी जनसंपर्क अभियान म्हणून याचा वापर करण्यात येत असल्याचे ही त्यांनी यावेळी आपल्या पत्रात नमूद केले.

नाट्यसंमेलनासाठी आंमत्रण पत्रिका छापल्या त्याच्यावर कोषाध्यक्ष आणि सेक्रेटरी यांची नावेच नाहीत. त्यांना किंमत नसेल तर आम्हाला कशी असणार. तसेच या नाट्यसंमेलनाचा वापर निवडणूकांसाठी होणार असल्याने यात सगळे राजकारणच होताना दिसत आहे. त्यामुळे या संमेलनाला मी जाणार नसल्याचे नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर यांनी सांगितले.

याबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसात सहा सभा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत २९ व ३० एप्रिल रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *