Breaking News

निकालानंतर उध्दव ठाकरे यांचा टोला, एवढ्या वर्षाच्या भ्रमातून कसबा बाहेर आला… भाजपची निती वापरा आणि फेका, शिवसेनेची आवश्यकता होती तोपर्यंत वापर केला

पुणे शहरातील कसबा पेठ निवडणूकीत २८ वर्षानंतर भाजपाचा पराभव करत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळविला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपाला खोचक शब्दात टोला लगावला. निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, एवढ्या वर्षांच्या भ्रमातून कसबा बाहेर आला आता देशही बाहेर पडेल, असा उपरोधिक टोला भाजपाला लगावला.

पुण्यातील कसबा पेठ पोट निवडणुकीत भाजपची २८ वर्षांची सत्ता उलथवून देत काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला. मविआतर्फे येथे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजपाच्या हेमंत रासने यांना ११ हजार ४० मतांनी पराभव करत धंगेकर विजयी झाले. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवास्थानी आयोजित पत्रकार परिषद घेत भाजपाला सुनावले.

त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या आयुक्ताच्या नियुक्तीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आपले मत व्यक्त करताना उध्दव ठाकरे म्हणाले, निवडणूक आयुक्तांची नियुक्ती ही विशेष समितीद्वारे व्हावी, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. या समितीत पंतप्रधान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असले पाहिजे, अशा सूचनाही दिल्या त्याबद्दल समाधानी असल्याचे स्पष्ट केले.

निवडणूक आयोगावर ताशेरे ओढताना उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्याय केला. पण सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला आशा आहे. आज त्या आशेला अंकूर फुटला आहे. कपिल सिब्बल म्हणाले, मी इथे उभा आहे. ते लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी. त्याचं रक्षण चार खांबांनी करावं. कसब्याचा आनंद आहे. एवढ्या वर्षाच्या भ्रमातून कसबा बाहेर पडत असेल तर देशही बाहेर पडेल. शिक्षक आणि पदवीधरचे निकाल बोलके आहेत. या पोटनिवडणुकीत इतक्या वर्षाच्या प्रभावाखालून मतदारांनी वेगळा विचार केला हे आशादायक चित्रं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, तो आपल्या देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी दिलासादायक आहे. त्यावर मी भाष्य केलं आहे. लोकशाही ठेवायची असेल तर पक्षांतर्गत लोकशाही जिवंत राहिली पाहिजे असं सांगणाऱ्या निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलली जायची. पूर्वी पंतप्रधानांच्या शिफारशीवरून आयुक्त निवडले जायचे. आता पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश आयुक्तांची राष्ट्रपतींकडे शिफारस करतील. बेबंदशाही रोखली पाहिजे. ती रोखली नाही तर काळ सोकावेल. निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा असा काळ सुरू आहे. त्यातील हा निर्णय दिलासादायक आहे.

उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या रणनीतीवर सणकून टीका करताना म्हणाले, भाजपाची निती वापरा आणि फेका आहे. ती निती ते सर्वत्र वापरतात. शिवसेनेची आवश्यकता होती तोपर्यंत वापर केला. त्यांनी अकाली दलापासून ममतापर्यंत तेच केलं. टिळक कुटुंबीयांच्या बाबतीतही त्यांनी तेच केलं. गिरीश बापटांसारख्या नेत्याला तब्येत बरी नसतानाही त्यांना प्रचारात आणलं. मनोहर पर्रिकर यांनाही त्यांनी तसंच प्रचारात आणलं होतं. पर्रिकरानंतर त्यांच्या मुलांना बाजूला टाकलं. ही त्यांची प्रवृत्ती आहे. सिलेक्टीव्ह वृत्ती असल्याची खोचक टीकाही केली.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, सहा हजार कोटी पंतप्रधान कार्यालयाकडून वसूल

साडे सहा हजार कोटी रुपये पंतप्रधान कार्यालयाने वसूल केले आहेत. मी स्वतःचे काहीच बोलत नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *