Breaking News

माधव भांडारी यांचे प्रत्युत्तर, नाना पटोले यांनी इतिहासाबद्दल माहिती घेऊन बोलावे

स्वातंत्र्यपूर्व काळातील बंगाल प्रांताच्या सरकार स्थापनेवेळी भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मुस्लीम लीगशी नव्हे तर फजलूल हक कृषक प्रजा पार्टीशी आघाडी केली होती. काँग्रेस – मुस्लीम लीगला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी डॉ.मुखर्जी यांनी कृषक प्रजा पार्टी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉकशी आघाडी केली होती, हा इतिहास आहे. इतिहासातील घटनांबद्दल बोलताना नाना पटोले यांनी पूर्ण माहिती घेऊनच बोलावे, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी लगावला.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बंगाल प्रांतात मुस्लीम लीगशी युती केली होती, अशी धादांत खोटी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अलीकडेच प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यावेळच्या घटनांची तपशीलवार माहिती देत नाना पटोले यांचा जोरदार समाचार घेतला.

माधव भांडारी यांनी पत्रकात म्हटले आहे की, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अलीकडेच इतिहासाबद्दलचे आपले अगाध ज्ञान पाजळले आहे. नाना पटोले ज्या बंगाल मंत्रिमंडळाबद्दल बोलले आहेत ते सरकार मुस्लीम लीगचे नव्हते. त्या सरकारचे मुख्यमंत्री होते कृषक प्रजा पार्टीचे फजलूल हक. फजलूल हक हे समाजवादी विचारांचे आणि कट्टर मुस्लीम लीग विरोधी म्हणून ओळखले जात होते. काँग्रेस आणि मुस्लीम लीग यांना सरकार बनविण्यापासून रोखण्यासाठी डॉ. मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील हिंदू महासभा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फॉरवर्ड ब्लॉक आणि फजलूल हक यांचा कृषक प्रजा पार्टी हे तीन पक्ष एकत्र आले होते. फजलूल हक यांच्या कृषक प्रजा पार्टीने मुस्लीम लीग च्या फाळणीच्या ठरावाला विरोध केला होता. अशा प्रखर राष्ट्रवादी विचारांच्या फजलूल हक यांच्याशी डॉ. मुखर्जी यांनी हातमिळवणी केली होती.

माधव भांडारी पुढे आपल्या पत्रकात म्हणाले की, डॉ. मुखर्जी यांनी मुस्लीम लीगशी कधीच आघाडी, समझोता केलेला नव्हता. उलट काँग्रेसचा इतिहास मुस्लीम लीगबरोबरच्या मैत्रीचा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहासाचा अभ्यास करणे जमत नसेल तर किमान इतिहास समजून तरी घ्यावा आणि मगच बोलावे, असा टोलाही यावेळी लगावला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *