Breaking News

अजित पवार म्हणाले, फडणवीसजी तुम्ही मनावर घेतले तर ते लगेच होईल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्या

विधानसभेचे नियमित कामकाज सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याबाबतची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सकाळी केली. तसेच मागील ३५ वर्षापासून जयंत पाटील हे सभागृहाचे सदस्य असून जे व्हायला नको ते झाले. त्यामुळे जयंत पाटील यांच्यावरील करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घ्यावी अशी मागणीही अजित पवार यांनी यावेळी सभागृहात केली.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलू दिले जात नसल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. मात्र राहुल नार्वेकर हे नियमावर बोट ठेवत विरोधी बाकावरील भास्कर जाधव यांना बोलण्याची संधी नाकारली. त्यामुळे चि़डलेल्या जयंत पाटील यांनी किमान तुम्ही तरी निर्लज्जपणा करू नका अशी शेरेबाजी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उद्देशून केली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोण आहे तो अशी विचारणा करत निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशन कालावधी पूरते निलंबित केले.

शिंदे-फडणवीस सरकारच्या या दडपशाहीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून विधानभवन परिसरात सातत्याने आंदोलन केले. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजावर बहिष्कारही घातला.

त्यानंतर मागील तीन दिवसांच्या आंदोलनानंतर अखेर महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये चर्चा होऊन तोडगा निघाला. त्यानंतर निघालेल्या तोडग्यानुसार विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मागणी केली.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, इथे बसलेल्या सगळ्यांना माहित आहे. तुम्ही जर मनात आणले तर जयंत पाटील यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई लगेच मागे घेतली जाईल. त्यामुळे तुम्ही या संदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी केली.

जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर ते इथे येतात अर्थात प्रवेशद्वारावर येतात मात्र आत येऊ शकत नाहीत. इथे म्हणजे ते आमदार निवासात आहेत. त्यांच्यावरील कारवाई मागे घेऊन त्यांना पुन्हा एकदा सभागृहातील कामकाजत सहभागी होता येईल. तसेच तुम्ही त्यांना चांगलेच ओळखता अशी बाबही अजित पवार यांनी फडणवीसांच्या लक्षात आणून दिली.

त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आता मुख्यमंत्री नाहीत. ते दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. ते आले की, त्यांच्यासोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल असे आश्वासन सभागृहाला दिले.

दरम्यान, महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावर सभागृहात ठराव न मांडल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निलंबन मागे घ्या अशी सभागृहात विनंती करुनही सरकारने दुर्लक्ष केल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावर ठराव मांडावा अशी मागणी केली मात्र ती मागणी मान्य करण्यात आली नाही शिवाय आमदार जयंत पाटील यांचे निलंबनही मागे घ्यावे अशी मागणी केली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला असल्याने निर्णय घेता येणार नाही अशी माहिती सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी कामकाजावर बहिष्कार टाकत व सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करून सभात्याग केला.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *