Breaking News

कपिल पाटील स्वत:ला कोण समजतो? चंद्रकांत पाटीलांचा संतप्त सवाल प्रशांत परीचारक यांच्यावरून विधान परिषदेत गदारोळ : कामकाज दिवसभरासाठी तहकूब

मुंबई : प्रतिनिधी

परिचारक यांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सभागृहात बोलावणे ही घातक परंपरा सुरू होर्इल. त्यांनी जे शब्द प्रयोग केले ती परंपरा या देशामध्ये ज्यांची आहे ते सत्तेवर असतील तर हा प्रश्न अधिक गंभीर बनतो. त्यांच्या प्रस्तावाला अहवालाच्या माध्यमातून त्यांना परत बोलावण्याची संमती कोणी दिली हे समजले पाहिजे. परिचारक जे काही बोलले ते माफ करण्यालायक आहे की नाही हे सरकारने अगोदर स्पष्ट केले पाहिजे अशी मागणी शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी करताच संतप्त झालेले महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तो स्वत:ला कोण समजतो? तु आहेस तरी कोण अशा आशयाची वक्तव्ये वापरत आमदार कपिल पाटील यांना धमकाविण्याचा प्रकार विधान परिषदेत घडला.

त्यामुळे विरोधी बाकावरील सर्व सदस्यांनी एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने विधान परिषदेचे कामकाज सुरुवातीला १० मिनिटासाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

सैनिकांबद्दल अपशब्द काढल्याप्रकरणी आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन रद्द करण्याच्या मुद्यावर बोलताना कपिल पाटील यांच्या विधानावर सभागृह नेते चंद्रकांत पाटील संतप्त झाल्यामुळे निर्माण झालेल्या गदारोळामुळे सोमवारी विधान परिषदेचे कामकाज सुरूवातीला १० मिनिटे व नंतर दिवसभरासाठी तहकूब झाले.

शिवसेनेचे अॅड. अनिल परब यांनी परीचारक यांच्या निलंबनाचा मुद्दा मांडला. त्यांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव सभागृहात गोंधळात मंजूर झाला. त्यास आक्षेप घेतल्यानंतर सोमवारी नव्याने प्रस्ताव द्यावा असे सांगण्यात आल्याने आपण दोन प्रस्तावांची सूचना केली आहे. त्यातील एक प्रस्तावाला मान्यता द्यावी. संपूर्ण महाराष्ट्राचे याकडे लक्ष लागले आहे. हा विषय सर्वसाधारण नाही. जे जवान देशाच्या सीमेवर लढत आहेत, रक्त सांडत आहेत, त्यांच्या पत्नींचा अवमान केला आहे. याला कोणीही क्षमा देऊ शकत नाही म्हणून हा प्रस्ताव सभागृहात आला आहे. या प्रस्तावावर त्यांना माफी द्यावी असे कोणाचे मत असेल तर तसे त्यांनी सांगावे. कोणीही याला समर्थन देणार नाही. त्यामुळे हा प्रस्ताव घ्यावा. उच्चाधिकार समितीचा अहवाल ठेवायचा होता तर तो मतास टाकायला हवा होता. देशद्रोहापेक्षा हा मोठा गुन्हा आहे. कोणी अडचण आणत असेल तर आपण नियमाला बगल देऊन प्रस्ताव मांडायला परवानगी देऊ शकता. कायद्याचे पुस्तक दाखवून आपण मला खाली बसवाल असे वाटत नसल्याचे मत परब मांडले.

सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी या समितीमध्ये एकमताने ठराव झाला असे मत व्यक्त केले आहे. त्याबद्दल मी असहमती व्यक्त करते असे शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

या प्रस्तावावर बोलताना  कपिल पाटील म्हणाले की, परिचारक यांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सभागृहात बोलावणे ही घातक परंपरा सुरू होर्इल. त्यांनी जे शब्द प्रयोग केले ती परंपरा या देशामध्ये ज्यांची आहे ते सत्तेवर असतील तर हा प्रश्न अधिक गंभीर बनतो. त्यांच्या प्रस्तावाला अहवालाच्या माध्यमातून त्यांना परत बोलावण्याची संमती कोणी दिली हे समजले पाहिजे. परिचारक जे काही बोलले ते माफ करण्यालायक आहे की नाही हे सरकारने अगोदर स्पष्ट केले पाहिजे.

यावर सभागृह नेते चंद्रकांत पाटील संतप्त झाले. कपिल पाटील यांनी एक वाक्य उच्चारले. मात्र आपण शांत बसलो होतो. कपिल पाटील यांनी वारंवार एका विचारधारेशी, या शब्दाचा उल्लेख केला. तो या विषयाशी जोडता कामा नये. त्यावर कपिल पाटील म्हणाले की, मंत्र्यांना सभागृहात धमकी देता येणार नाही. यावर पाटील अधिक संतप्त झाले आणि दोघांमध्ये खडाजंगी सुरू झाली. दरम्यान विरोधी पक्षाचे सदस्य उभे राहून एकत्र बोलू लागले. कपिल पाटील विषयाला सोडून काही बोलले असतील ते आक्षेपार्ह असेल तर कामकाजातून काढून टाकू, असे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. सभागृह तहकूब झाल्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्याने कामकाज सुरू झाल्यानंतर आसनास्थ झालेल्या तालीका सभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *