Breaking News

मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी… नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाली. या नैसर्गिक संकटामुळे हजारो हेक्टरवरील उभी पिके वाया गेल्याने हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहिर करावी या मागणीसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उध्दव ठाकरे गटाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करत घोषणाबाजी केली.

शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेच पाहिजेत…अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे… जाहीर करा, जाहीर करा शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करा… कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही…बळीराजाला मदत मिळालीच पाहिजे… मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी… नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा… अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा सहावा दिवस असून अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी महाविकास आघाडी आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

Check Also

एनजीएसपी पोर्टलवर घेतली जातेय नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *