Breaking News

यंदाचे महालक्ष्मी सरस प्रदर्शन वांद्र्यात नाही तर नवी मुंबईत: काय असणार प्रदर्शनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

कोरोना काळ वगळता मागील अनेक वर्षापासून महालक्ष्मी सरस प्रदर्शन वांद्रे येथील रंगशारदा समोरील मैदानावर राज्य सरकारकडून आयोजित करण्यात येत असे. मात्र यावर्षी हे प्रदर्शन नवी मुंबईतील सिडको मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने (उमेद) नवी मुंबईत पहिल्यांदाच राज्यस्तरीय ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन-२०२३’ चे आयोजन करण्यात येत आहे. वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटर या ठिकाणी ८ ते १९ मार्च २०२३ या कालावधीत हे प्रदर्शन भरणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे, अशी माहिती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी सिडको भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून संघटित करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण क्रयशक्तीला बाजारपेठ मिळावी तसेच व्यवसायवृद्धी व्हावी, असा या प्रदर्शनाचा उद्देश असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च २०२३ रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. महालक्ष्मी सरस प्रदर्शन अत्यंत नावीन्यपूर्ण आणि ग्रामीण संस्कृतीला शहरापर्यंत पोहोचविण्याचे अनोखे व्यासपीठ आहे. या राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये सुमारे ५११ स्टॉल असणार आहेत. यात महाराष्ट्रातील ३५० आणि देशभरातून सुमारे ११९ स्टॉल असणार आहेत. तसेच नाबार्डचे ५० स्टॉल असतील. प्रदर्शनात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुगरणींचे खमंग आणि रुचकर शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे ७० स्टॉल्सचे भव्य फूड कोर्ट असणार आहे. या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसर, हातमागावर तयार केलेले कपड़े, वुडन क्राफ्ट, बंजारा आर्ट, वारली आर्टच्या वस्तू असणार आहेत. याशिवाय महिलांच्या आकर्षणाचे अनेक प्रकारचे दागिणे, लाकडी खेळणी, इतर राज्यातील दुर्मिळ वस्तू या प्रदर्शनात असणार आहेत. नागरिकांना प्रदर्शनाचा आरामदायी अनुभव घेता यावा याकरिता संपूर्ण प्रदर्शन वातानुकूलित असणार आहे. त्याचप्रमाणे सहकुटुंब भेट देणाऱ्या कुटुंबांचा विचार करून लहान मुलांना खेळवाडी (प्ले एरिया) उभारण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष लक्षात घेऊन स्वतंत्र मिलेट दालन यात असणार आहे. खात्रीचे आणि प्रमाणित असे सेंद्रिय पदार्थ शहरवासियांना या प्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत.

राज्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी उमेद अभियान नेहमीच कार्यरत असते. महिलांना स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून संघटित करणे तसेच ग्रामीण भागातील महिलांना क्षमता विकास आणि कौशल्यवृद्धीसाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेद अभियानातून प्रशिक्षित महिला स्वयंसिद्ध व्हायला तयार आहेत. अनेक प्रकारचे व्यवसाय त्या करू लागल्या आहेत. या महिला स्वयंपाकघरातील गरजेच्या पदार्थांपासून ते एलईडी लाईट निर्मितीपर्यंत अनेक प्रकारची उत्पादने आता बाजारात आणत आहेत. महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता गटांना त्यांच्या वस्तू, उत्पादने, सहजपणे शहरी नागरिकांपर्यत पोहोचविता येतात. त्यांना हक्काची शहरी बाजारपेठ अनुभवण्याची चांगली संधी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळते.

ग्रामविकास विभागाचे मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांचे या प्रदर्शनाला नियमित स्वरुपात मार्गदर्शन लाभत आहे. या प्रदर्शनातून मोठ्या प्रमाणात विक्री होऊन ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला हातभार लागावा यासाठी प्रदर्शनाला भेट देऊन शुद्ध खात्रीच्या वस्तू आणि पदार्थाची खरेदी करावी, असे आवाहन राऊत यांनी केले आहे.

Check Also

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *