Breaking News

अजित पवार कडाडले, महाराष्ट्र असा – तसा वाटला का?

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नुकतेच सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांवर हक्क सांगितल्यानंतर आज सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यावर हक्क सांगितल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बसवराज बोम्मई यांना चांगलेच सुनावले.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, तुम्ही महाराष्ट्र मागायला निघालात का? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र असा- तसा वाटला का? असा रोखठोक आणि संतप्त सवाल केला.

राष्ट्रवादी काँग्रेसची आज प्रदेश कार्यालयात पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आले असता अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर आता अक्कलकोटवरही कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी दावा केला. त्यावर बोलताना अजित पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले.

कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी अशी वक्तव्ये करणे ताबडतोब थांबवावे. त्यांचे हे वक्तव्य निंदनीय असून त्याचा अजित पवार यांनी निषेध केला.

लोकांचे लक्ष महागाई आणि बेरोजगारीवरुन हटवण्यासाठी अशी वक्तव्य केली जात आहेत. सध्या कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात काय संचारले आहे काय माहित. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कडक शब्दात त्यांना सुनावले पाहिजे. आता फक्त मुंबई मागणे बाकी ठेवले आहे असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

केंद्राने यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा. महाराष्ट्र अशी वक्तव्ये कदापि खपवून घेणार नाही असा इशाराही देत अजित पवार पुढे म्हणाले, प्रत्येक राज्याचा अस्मितेचा प्रश्न असतो. अनेक मुख्यमंत्र्यांनी राज्याला एकसंघ ठेवण्याचा काम केले आहे. आता काहीही कारण नसताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका मांडली पाहिजे असेही ते म्हणाले.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *