स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. नाशिकमध्ये झालेल्या आजच्या बैठकीत काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून जे लोक गेले होते, त्यांना पक्षाने पाठवले नव्हते, त्यांच्या उपस्थितीशी पक्षाचा काहीही संबंध नाही, त्या लोकांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राज्यात नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आतापर्यंत ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत. या अर्जांची छाननी सुरु असून १२ तारखेला राज्य पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होत आहे, या बैठकीत उमेदवारांसंदर्भात निर्णय घेतला जाईल.
मुंबई महापालिकेबाबतचा निर्णय अद्याप नाही…
मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढावी अशी अनेक नेते, पदाधिकारी व पक्ष कार्यकर्त्यांची भावना आहे, अशा भावना वेळोवेळी व्यक्त केलेल्या आहेत पण अद्याप मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली नाही, निवडणूक जाहीर झाली की त्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..
मोहन भागवतांना कोणीही गांभिर्याने घेत नाही…
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मोहन भागवत हे कन्फ्यूज आहेत, त्यांची विधाने सातत्याने बदलत असतात. समाजातील अस्पृशता, स्त्री-पुरुष समानता यावर ते कधीच बोलत नाहीत, ते विशिष्ट वर्गाच्या मक्तेदारीबाबतच बोलत असतात, त्यांना गांभिर्याने घेण्याची आवश्यकता नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे ऐकले नाही. ७५ वर्षानंतर निवृत्ती घ्या असे भागवत आणि संघाने सांगूनही नरेंद्र मोदींनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. अजित पवार यांना सत्तेत घेऊ नका असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते त्यांनीही मोहन भागवत यांचे ऐकले नाही. मोहन भागवत यांच्या आदेशाचे वा सुचनांचे त्यांच्या परिवारात पालन केले जात नाही तर देशातील लोक काय ऐकणार, असा प्रतिप्रश्नही केला.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून विभागनिहाय प्रभा-यांची नियुक्ती
ज्येष्ठ नेत्यांवर विभागीय प्रभारी म्हणून जबाबदारी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने या निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्येष्ठ नेत्यांची विभागीय प्रभारी म्हणून नियुक्ती आहे.
नागपूर विभागाची जबाबदारी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वड्डेटीवार यांच्याकडे, पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडे सोपवली आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र, अॅड. यशोमती ठाकूर यांच्याकडे अमरावती विभागाची, मराठवाडा प्रभारी म्हणून माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची तर कोकण विभाग प्रभारी म्हणून माजी मंत्री काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.
Marathi e-Batmya