Breaking News

संभाजीराजेंनी सोडले भाजपाला, केल्या या दोन घोषणा 'स्वराज्य' संघटनेची स्थापना, स्वतंत्र राजकिय वाटचाल करणार

भाजपाचे सहयोगी सदस्य म्हणून राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त केलेले माजी खासदार संभाजी राजे यांनी आज मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नसल्याचे सांगत स्वराज्य या नव्या संघटनेची स्थापना केल्याचे जाहीर करत या संघटनेच्या माध्यमातून राजकारणात उतरणार असल्याचे जाहीर केले.
काही दिवसांपूर्वी खासदार संभाजी राजे यांनी १२ मे रोजी आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. त्या अनुषंगाने आज त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत आपल्या आगामी राजकीय वाटचाली संदर्भात भूमिका मांडली. खासदार संभाजी राजे यांच्या खासदारकीची मुदत आज संपत आहे. यापार्श्वभूमीवर त्यांनी वरील घोषणा केली.
इथून पुढे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करत आजपासून आपण कोणत्याही पक्षाचे सदस्य नसल्याचं सांगत अप्रत्यक्षपणे भाजपाची साथ सोडत असल्याचे देखील स्पष्ट केले. त्याचबरोबर ‘स्वराज्य’ या नव्या संघटनेची स्थापना केल्याचे जाहिर केले. तुम्ही वेगळा पक्ष स्थापन करायला हवा असं अनेकांनी सांगितलं. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. सोशल मीडियाची, शिवभक्तांची काय ताकद आहे हे गेल्या काही दिवसांत समजले. या ५-६ दिवसांत अनेकांनी मला शक्य त्या सर्व माध्यमातून सांगितलं की संभाजीराजे, तुम्ही स्वतंत्र पक्ष काढा. मी त्यांचा आदर आणि आभार व्यक्त करतो. हीच भावना आमच्याबद्दल राहू द्यावी”, असं ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना हा आपल्या राजकीय वाटचालीचा पहिलाच टप्पा असल्याचं सांगतानाच संभाजीराजे भोसले यांनी निवडणुकीच्या राजकारणात भविष्यात उतरणार असल्याचे संकेत दिले.
माझ्या राजकीय वाटचालीचा पहिलाच टप्पा असेल स्वराज्य संघटित करणे. आपली ताकद तिथे संघटित व्हायला हवी. मी सांगू इच्छितो की ही संघटना उद्या राजकीय पक्ष झाला तरी त्यात कुणीही वावगं समजू नये. माझी त्यासाठी तयारी देखील आहे. पण पहिल्या टप्प्यात आपण संघटित होणं गरजेचं आहे. स्वराज्य संघटित होण्यासाठी मे महिन्यातच माझा महाराष्ट्राचा दौरा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मला राजकारण अजून समजत नाही. आता कुठे शिकायला लागलोय अशी मिश्किल टिपण्णी करत मी सर्व २९ अपक्ष आमदारांची भेट घेणार आहे. त्यात काही चुकीचे नाही. तुम्हाला राज्यसभा खासदारकीसाठी १० आमदारांचे अनुमोदन लागते. मी सर्व प्रमुख नेत्यांची देखील भेट घेणार आहे. मी आज ठरवलंय की अपक्ष म्हणून राज्यसभेवर जायचे. याप्रकारे त्यांना सन्मान करायचा असेल, तर चांगलंच आहे. नाहीतर आपला मार्ग सुरू आहेच. कुणी पक्ष काढणं हे काही चुकीचं नाहीये. दुसऱ्यांनी काढायचा आणि आम्ही काढायचा नाही असं काही आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मी वेळप्रसंगी लोकसभा देखील लढवेन. असं मी म्हटलोच नाही की लोकसभा निवडणूक लढवणार नाही. महाराष्ट्रातील काही मोजके लोक असे आहेत की जे कुठूनही निवडणूक लढवू शकतात. त्यातला मी एक आहे. माझी माझ्याशीच स्पर्धा आहे. मी सर्व शिवभक्त, शाहूभक्तांना संघटित करण्यासाठी हे करतोय. त्याचा वेगळा अर्थ ज्यांना काढायचाय त्यांनी काढावा असा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, संघटनेचं चिन्ह ठरलंय का? अशी विचारणार होताच ते म्हणाले, अजून चिन्ह किंवा रंग ठरवलेला नाही. जसं दौऱ्यात जाऊ, तिथे लोक सांगतील. पण रक्तात आणि हृदयातला केशरी पट्टा तर कुणी काढून घेऊ शकत नाही असा उपरोधिक टोलाही त्यांनी भगव्या रंगाच्या झेंड्यावरून इतर राजकिय पक्षांना लगावला.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *