Breaking News

स्वपक्षात एकटे पडलेले खडसे विस्थापित तर नाही होणार ? भाजपमध्ये एकटे पडलेल्या खडसेंना इतर पक्षात मात्र मुबलक मित्र

मुंबई : प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणात ४० वर्षे एकाच पक्षात राहून राजकिय विरोधकांशी दोन हात केले. त्याच पक्षाने सत्तेत आल्यानंतर पहिल्या दोन वर्षातच एकनाथ खडसे यांना एखाद्या खड्यासारखे बाजूला सारत स्वपक्षातच एकटे पाडण्यात येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खडसे हे भाजपमध्ये एकटे पडल्याचे चित्र पाह्यला मिळत असून त्यांच्यावर विस्थापित होण्याची पाळी तर येणार नाही ना? अशा चर्चेला दस्तुरखुद्द भाजपमध्येच सुरुवात झाली आहे.

सत्ता परिवर्तन झाल्यानंतर पहिल्या दिड वर्षातच मंत्रीपदी विराजमान झालेल्या विनोद तावडे, पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर यांच्यासह मुनगंटीवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मात्र या मंत्र्यांवर राजीनामा देण्याची कोणतीही पाळी आली. उलट त्यांच्या बचावासाठी पक्षातील ज्येष्ठ नेते असलेल्या एकनाथ खडसे यांना पुढे करण्यात आले. परंतु ज्यावेळी एकनाथ खडसे यांच्यावर दाऊदसह भोसरी-कल्याण मधील भूखंड लाटल्याप्रकरणी आरोप झाले. त्यावेळी त्यांच्या बचाव करण्याऐवजी सरळ मंत्री पदाचा राजीनामा घेण्यात आला. कालौघात खडसे यांच्यावरील अनेक आरोप हे केवळ निव्वळ आरोपच ठरले. मात्र त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करण्याबाबत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्सुक नसल्याची बाब उघडकीस आल्याने महाराष्ट्र भाजपमधील कोणताही बडा पदाधिकारी खडसे यांच्याशी सलोख्याचे आणि सौहार्दाचे संबध ठेवायला तयार नसल्याचे भाजपमधील पदाधिकारी खाजगीत सांगत आहेत.

त्यामुळे काहीशा कातावलेल्या खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारला अडचणीत आणण्याच्या दृष्टीने विधानसभेत आणि बाहेर प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तसेच मनात खदखणारा असंतोषही त्यांनी ऐनकेन प्रकारे मिळेल त्या ठिकाणी जळगांव, रावेर तर कधी जालन्यातील जाहीर कार्यक्रमात बोलून दाखविण्यास सुरूवात केली. त्यामुळे खडसे हे राजकिय कावलेल्या स्थितीत असल्याची बाब आता लपून राहीलेली नाही. मात्र त्यांच्या या कावलेल्या परिस्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भीक घालायला तयार नसल्याने राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि पक्षातील सहकारी त्यांच्यापासून दोन हात लांब ठेवत असल्याचे भाजपमधील एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

याच्या नेमके उलट विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना जाहीर कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येत असून त्यांचा यथोचित्त सन्मानही ठेवत आहेत. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात तर पडत्या काळात जून्या मित्रांना विसरू नका असा धीराचा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही असाच सल्ला देत एकनाथ खडसे यांना मित्रत्वाची जाहीर आठवण करून दिली. त्यामुळे आगामी काळात एकनाथ खडसे हे स्वपक्षात एकटेच राहणार की इतर पक्षातील मित्रांच्या भरोशांवर विस्थापित होणार याचे चित्र ऐन विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूकीपूर्वीच स्पष्ट होईल.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *