Breaking News

एलिफंटा बेट महावितरणच्या दिव्यांनी लवकरच उजळणार ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली पाहणी

मुंबई : प्रतिनिधी
जागतिक वारसा लाभलेल्या भारतातील १७ सौंदर्य स्थळांपैकी एलिफंटा लेणी (घारापुरी बेट) येथे ७० वर्षात प्रथमच वीज पोहोचविण्यास ऊर्जा विभाग यशस्वी झाला आहे. त्यामुळे एलिफंटा बेट लवकरच वीजेच्या प्रकाशात उजळणार असून रात्रीही येथे पर्यटनाचा आनंद उचलता येणार आहे. महावितरणने या बेटावर वीज पोहोचविण्यासाठी केलेल्या कामाची पाहणी आज ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बेटावर जाऊन केली. या प्रसंगी त्यांच्यासोबत ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एलिफंटा लेणी आता विद्युत दिव्यांच्या प्रकाशाने लखलखणार आहे.

राज्य शासनाने घारापुरी बेटाचा विकास करण्यासंबंधी जबाबदारी ही मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) या संस्थेस सोपवली व त्यांच्या तर्फे महावितरण कंपनीस बेटावर पारंपरिक पध्दतीने वीज पुरवठा करण्यासाठीचे अंदाज पत्रक देण्यासंबंधी कळवले.
त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या भांडुप परिमंडळाने एलिफंटा लेणी विद्युतीकरण करण्याकरता समुद्र तळापासून मरीन केबल तसेच घारापुरी बेटावरील विद्युतीकरणासाठी लागणाऱ्या साहित्याचा २१ कोटी रूपयांचा प्रस्ताव एमएमआरडीएकडे पाठवण्यात आला होता, त्यापैकी १८.५ कोटी रूपयांच्या खर्चास मंजुरी मिळाली.
विद्युतीकरणाच्या कामात प्रामुख्याने २२ केव्ही, सिंगल कोअर केबल (३+१ अतिरिक्त केबल) समुद्राखालून ७ किमी टाकण्याचे काम करण्यात आले व त्याची यशस्वीपणे चाचणी पूर्ण करण्यात आली. यासाठी प्लाउ तंत्रज्ञान पध्दतीचा वापर करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र शासनाने या बेटावर वीज पोहोचवण्याचा ‍निश्चय केला. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या दिशेने यशस्वी प्रयत्न केल्यामुळे या बेटावर वीज नेणे शक्य झाले आहे. यामुळे घारापुरी बेटावरील ९५० लोकांना वीज पुरवठा होणार असून मोठया प्रमाणात पर्यटनाचा विकास करता येणे शक्य होणार आहे.

Check Also

१०४ वर्षांच्या आज्जींनी बजावला गृह मतदानाचा हक्क

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाचा पर्याय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *