Breaking News

सांस्कृतिक क्षेत्रातील राजकारणातही शिवसेना गोंधळलेलीच शिवसेना आपल्याच पक्षाच्या उपनेत्याच्या विरोधात मतदान करणार?

मुंबई : प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणात भाजपबरोबर सत्तेच्या राजपाटावर शिवसेना जरी बसलेली दिसत असली. तरी त्या राज पाटावर बसून भाजपला कधी विरोध तर कधी सहकार्य करत स्वत: गोंधळल्याचे चित्र जनतेला दाखवून देत आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील राजकारणातही शिवसेनेची अवस्था नेमकी गोंधळाची झाली असून अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत स्वपक्षाचे उपनेते तथा अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना निवडून आणायचे की पाठिंबा दिलेल्या नाट्य निर्माता प्रसाद कांबळींना मदत करायची या संभ्रमात सध्या शिवसेना अडकल्याचे दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या झालेल्या निवडणूकीत नाट्य निर्माता प्रसाद कांबळी आणि माजी अध्यक्ष मोहन जोशी यांच्या पँनलमध्ये थेट लढत झाली. या लढतीत सुरुवातीला भाजपने आणि नंतर शिवसेनेने प्रसाद कांबळी यांच्या पँनलला थेट मदत करत मुंबईतील १६ जागांपैकी ११ जागा कांबळी पँनलला जिंकून दिल्या. तर उर्वरीत ५ जागेवर मोहन जोशी यांच्या पँनलचे उमेदवार निवडूण आले. या विजयी उमेदवारामध्ये शिवसेना उपनेते डॉ.अमोल कोल्हे यांचा समावेश आहे.

प्रसाद कांबळी यांच्या पँनलला मदत करण्यासाठी शिवसेना नेते तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी मुंबईत ठिकठिकाणी बैठका घेत प्रचार केला होता.

आता नाट्य परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी लवकरच निवडणूक होणार असून या निवडणूकीच्या रिंगणात प्रसाद कांबळी यांच्याविरोधात डॉ. अमोल कोल्हे हे उतरले आहेत.  त्यातच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणूकीत मला मदत करा अशी मागणी डॉ. कोल्हे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता अध्यक्ष पदासाठी प्रसाद कांबळी यांना मदत करायची की स्वपक्षाचे उपनेते असलेल्या डॉ.कोल्हे यांना मदत करायची या संभ्रवास्थेत शिवसेना सापडली आहे. जर कांबळींना मदत केली तर स्वपक्षाचा उपनेता पराभूत होईल आणि त्यातून राज्यातील राजकारणात पक्षाविषयी वेगळा संदेश जाईल अशी एका बाजूला भीती सेनेत निर्माण झाली आहे. तर सुरुवातीला कांबळी यांना मदत केली मात्र आता पक्षाचा उपनेता उभा रहात असल्याने त्यास मदत केल्यास शिवसेना दिलेला शब्द फिरवते असा संदेश सांस्कृतिक क्षेत्रात जावून त्याचेही राजकिय परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेनेची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झालेली आहे.

अध्यक्ष पदासाठी किमान ३० मतांची आवश्यकता

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी किमान ३१ मतांची आवश्यकता आहे. मुंबईत १६ मते तर मुंबईबाहेर ४४ मते आहेत. यापैकी मुंबईत फक्त पँनल टू पँनल निवडणूका होतात. तर मुंबईबाहेर स्थानिक पातळीवरील राजकारणानुसार निवडणूका होतात. त्यामुळे मुंबईत प्रसाद कांबळी यांच्याकडे ११ मते हक्काची असली तरी राज्यातील ४४ मतांपैकी आणखी २० मते त्यांना स्वत:कडे फिरवावी लागणार आहेत. प्रसाद कांबळींना ओळखणारे मुंबईत मोठ्या प्रमाणावर असले तरी राज्यात किती ओळखतात याबाबत साशंकता आहे. तर डॉ. अमोल कोल्हे हे संभाजी या मालिका आणि नाटकामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहेत. तसेच त्यांना ओळखणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांना कमी त्रास घ्यावा लागेल असे बोलले जात आहे. मात्र या निवडणूकीत शिवसेना काय भूमिका घेते यावर त्यांच्या अध्यक्ष पदाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *