Breaking News

महादेव अॅप प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत मोठी माहिती

‘महादेव ॲप’ या ऑनलाइन जुगार चालवणाऱ्या विरोधात विविध राज्यात दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राज्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. राज्यातील अशा प्रकारचे गुन्हे आणि गैरप्रकार रोखण्यासाठी आता राज्य शासन डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य ॲड. आशिष शेलार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी माहिती देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महादेव ॲप ही मूळ कंपनी स्थापन करण्यात आली. त्यानंतर ६७ वेगवेगळ्या वेबसाइट्स तयार करण्यात आल्या. या वेबसाइटचे मालक वेगवेगळे असले तरी त्यांची भागीदारी या महादेव ॲप मध्ये असल्याचे आढलून आले. मात्र, या ॲपची नोंदणी ही दक्षिण अमेरिकेत करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

राज्यातील दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने यात कोणाकोणाची गुंतवणूक आहे, हा पैसा कुठून आला आहे, याचा तपास विशेष पथक करीत आहे. याप्रकरणी दोन महिन्यांत कार्यवाही करण्यात येईल, अशी माहितीही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

ऑनलाईन गेमिंग च्या जाहिराती अनेक नामांकित व्यक्ती करत असल्याचे दिसते. त्यांनी अशा जाहिराती टाळाव्यात. तसेच या ऑनलाइन गेमिंग संदर्भात काही प्रतिबंधात्मक अथवा नियंत्रण आणणारी पावले केंद्र सरकारने टाकावीत, अशी विनंती केंद्र शासनाला केली जाईल. त्यानंतर यासंदर्भात उशीर होत असेल, तर राज्य शासन राज्यापुरती अशी नियमावली निश्चितपणे करेल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

राज्य शासन सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म संदर्भात एकत्रित धोरण आणत आहे. त्यात तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचे सहकार्य घेतले जात आहे. यासंदर्भात राज्य शासनाने निविदाही प्रसिद्ध केली असून पुढील वर्षाच्या एप्रिल मे महिन्यापर्यंत हा प्लॅटफॉर्म तयार होईल. त्यामुळे ऑनलाईन गेमिंग, डीपफेक अशा आव्हानांना आपण सामोरे जाऊ शकू, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सदस्य बच्चू कडू, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, ॲड. वर्षा गायकवाड आणि आदित्य ठाकरे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1735259152531017906

Check Also

ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला

सध्या देशभरात सुरु असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन्स मॅनेज करता येऊ शकते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *