Breaking News

स्कील नाही, मग पंतप्रधान मोदींचा स्कील इंडिया कार्यक्रम बिनकामाचा का? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी
परप्रांतीय मजुर राज्याबाहेर गेल्याने आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, महाराष्ट्रातील तरुणांमध्ये ते स्कील नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणत असतील तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्कील इंडिया कार्यक्रम बिनकामाचा ठरला का? असा सवाल करत मराठी तरुणांचे मानसिक खच्चीकरण जाणीवपूर्वक करत असल्याची टीकाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
दरम्यान देवेंद्र फडणवीस कितीही तरुणांवर अविश्वास दाखवू देत आमचा आपल्या महाराष्ट्रातील तरुणांवर विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र विकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आज मुंबईत झाली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे नेते परिवहन मंत्री अनिल परब यांनी संबोधित केले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देत तिन्ही मंत्र्यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार करत समाचार घेतला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील आणि विशेषतः मुंबईतील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याच्या बातम्या काही जणांकडून जाणीवपूर्वक पसरवण्यात आल्या. खरंतर देशामध्ये कोरोनासंदर्भात सगळ्यात चांगलं काम महाराष्ट्रात सुरू आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाचा महाराष्ट्रातील आकडा बराच वाढलेला असेल असा अंदाज केंद्र सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविला होता. मात्र राज्य सरकारने वेळीच उपाययोजना केल्या म्हणून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोवीड योध्दांना भक्कम पाठिंबा देतील असं वाटलं होतं. पण ते वेळोवेळी कोरोनाशी लढा देणाऱ्यांचा अपमान करत आहेत. उलट महाराष्ट्र बचाओ आंदोलन करून कोवीड योध्द्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवण्याचे काम भाजपने केल्याचा आरोप करत त्यांनी केला.
भाजपने परप्रांतीय मजूरांना घरी नेले असेही फडणवीस म्हणाले, मात्र या सर्वांच्या प्रवासासाठीचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले गेले. भाजपने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक पैसा दिला नाही. राज्याला पैसा न देता केंद्राला निधी देणारा भाजप महाराष्ट्राचा शत्रू आहे का असा आता प्रश्न पडलाय असा टोलाही त्यांनी लगावला.
कोवीड विरोधात आपण लढत असतानाच मुंबई, बीकेसी येथील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र केंद्रसरकारने गुजरातला हलवण्याचे काम केले, याचे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला दुःख आहे. फडणवीस यांनी २८ हजार कोटी रुपये केंद्राने महाराष्ट्राला दिल्याचे सांगितले, परंतु प्रत्यक्षात आतापर्यंत फक्त ६६४९ कोटी रुपये मिळाले असताना २ लाख ७१ हजार कोटी राज्याला मिळणार असल्याचेही फडणवीस म्हणतात ते मिळाले तर मी त्यांचे आताच आभार मानतो असा टोलाही त्यांनी लगावला.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *