Breaking News

काँग्रेस म्हणते आता आवाज पोहोचविलाच पाहिजे ‘स्पीक अप इंडिया’ ऑनलाईन मोहिम राबविणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी
समाजातील गरिब लोक, मजूर, लघु व मध्यम उद्योजक यांचा आवाज बुलंद करून त्यांच्या मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेसच्या वतीने गुरुवार, २८ मे, २०२० रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० ह्या वेळेत Speak Up India स्पीक अप इंडिया ही अनोखी ऑनलाईन मोहीम चालवली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी कोरोना संकटाशी दोन हात कसे करावे, याबद्दल सरकारला वेळोवेळी काही सूचना केल्या. याच सूचना बुलंद आवाजात भाजपा सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी सोशल मिडिया लाइव्हद्वारे स्पीक अप इंडिया अभियान चालवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या दरम्यान प्रामुख्याने दोन मागण्या उचलून धरल्या जाणार आहेत, यातील पहिली मागणी म्हणजे भारतामध्ये गरिबातील गरीब कुटुंबाला १० हजार रुपये हस्तांतरित केले जावेत. तसेच कॉंग्रेस पक्षाने सुचवलेल्या न्याय योजनेला धरून पुढील सहा महिन्यांसाठी त्यांच्या खात्यात प्रतिमाह ७५०० रुपये जमा करावेत. यासोबतच लघु व मध्यम उद्योगांना कर्जे देण्यापेक्षा थेट आर्थिक सहाय्य करावे, जेणेकरून मध्यम वर्गातील लोकांच्या हातात पैसे जातील. राज्यातून स्थलांतरित होऊन स्वगृही परतणाऱ्या मजूरांचा प्रवासखर्चासहीत सर्व खर्च केंद्रातील भाजप सरकारने करावा जेणेकरून ते आपापल्या घरी सुखरुप आणि सन्मानाने पोहोचतील. या श्रमिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे यासाठी मनरेगा अंतर्गत कामाचे दिवस २०० दिवसांपर्यंत वाढवावेत अशा मागण्या करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानाच्या माध्यमातून २८ मे ला सकाळी ठीक ११ वाजता स्वत:च्या सोशल मिडिया अकाऊंट वरून लाईव्ह येऊन मोदी सरकारकडे या मागण्या मांडायच्या आहेत. फेसबुक, ट्विटर, ईंस्टाग्राम, युट्युब अशा सर्व सोशल मिडिया अकाउंट वरुन लाईव्ह करू शकता. या शिवाय मजुरांशी, लघु उद्योजक, शेतकरी यांच्याशी संवाद साधून त्यांचाही आवाज मोदी सरकारापर्यंत पोहोचविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
*#SpeakUpIndia बोल भारता*
गरिब जनता, मजूर, लघु व मध्यम उद्योजक यांचा आवाज बुलंद करण्यासाठी मी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करतो आपण फेसबुक, ट्वीटर, यु ट्यूब या माध्यमातून केंद्र सरकारला जागे करा, त्यासाठी लाइव्ह या, व्हिडीओ तयार करा किंवा गावातील लघु उद्योजक, बारा बलुतेदार बांधव, मजूर शेतकरी यांच्याशी संवाद साधा त्याचा व्हिडीओ बनवा. या बांधवांना रोख मदत पोहोचविण्यासाठी आणि उद्या ११ ते दुपारी २ वाजेपर्यंतच्या वेळेत #SpeakUpIndia हा हॅशटॅग वापरून तो पोस्ट करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Check Also

पंतप्रधान मोदी यांच्या सातारा आणि सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जयराम रमेश यांचे प्रश्न

महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडल्यानंतर पुढील महिन्याच्या ७ मे रोजी तिसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *